टेकऑफपूर्वी पायलटच्या लक्षात आला बिघाड; हेलिपॅडवर ४५ मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर शिंदेंनी बदलला प्रवासाचा मार्ग
गुजरात दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्याने त्यांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागला. वडनगरहून अहमदाबादकडे हेलिकॉप्टरने जाण्याची तयारी सुरू असतानाच उड्डाणापूर्वी पायलटच्या निदर्शनास तांत्रिक अडचण आली. त्यामुळे हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.
शिंदे सध्या गुजरात दौऱ्यावर असून वडनगर येथे त्यांचा कार्यक्रम होता. अहमदाबादकडे रवाना होण्यासाठी ते हेलिपॅडवर पोहोचले होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी जवळपास ४५ मिनिटे हेलिपॅडवर प्रतीक्षा केली.
दरम्यान, तांत्रिक समस्या दूर होण्याची शक्यता पाहण्यात आली. मात्र, अखेर हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी एकनाथ शिंदे रस्ते मार्गाने वडनगरहून अहमदाबादकडे रवाना झाले. नियोजित कार्यक्रमासाठी ते अहमदाबादला पोहोचणार असल्याची माहिती आहे.
गुजरात दौरा पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे परतीचा प्रवास चार्टर्ड विमानाने करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या पुढील प्रवासाच्या साधनात बदल करण्यात आला आहे.