कोलकात्याहून शिलाँगला जाणाऱ्या 6E 7423 विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड; दोन तास प्रवासी विमानातच अडकले, खासदार पी. विल्सन यांची चौकशीची मागणी
कोलकाता : विमान प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोलकाता विमानतळावरून शिलाँगच्या दिशेने उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे इंजिन अचानक बंद पडल्याची घटना घडली. या विमानातून तीन खासदारांसह ६७ प्रवासी प्रवास करत होते. विमान धावपट्टीवरून हवेत झेपावण्यापूर्वीच हा तांत्रिक बिघाड झाल्याने संभाव्य मोठा अपघात टळला. मात्र, या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
नेमकं काय घडलं?
इंडिगोचे 6E 7423 क्रमांकाचे विमान कोलकाता येथून मेघालयातील शिलाँगला जाणार होते. विमानतळावरील पार्किंग क्षेत्रातून धावपट्टीच्या दिशेने जात असताना अचानक विमान थांबले. त्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आणि इंजिन बंद पडले.
या अनपेक्षित प्रकारामुळे प्रवाशांना विमानातून बाहेर पडता आले नाही. जवळपास दोन तास त्यांना विमानाच्या आतच थांबावे लागले. अखेर वैमानिकाने प्रवाशांना तांत्रिक बिघाडामुळे नियोजित उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.
खासदार पी. विल्सन यांची विमान कंपनीवर नाराजी
या विमानातून प्रवास करणारे डीएमकेचे राज्यसभेतील खासदार पी. विल्सन यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. विमानातील प्रवाशांना जवळपास दोन तास प्रतीक्षा करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना विल्सन यांनी विमानाच्या तांत्रिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानांची उड्डाणापूर्वी योग्य प्रकारे तपासणी केली जाते का, याची चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. विमान कंपन्यांकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
विमानात तीन खासदारांचा प्रवास
या विमानातून पी. विल्सन यांच्यासोबत आणखी दोन खासदार प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या दोन्ही खासदारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. एकूण ६७ प्रवासी विमानात असल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
इंडिगोच्या आर्थिक अडचणीही चर्चेत
दरम्यान, इंडिगो एअरलाइनसमोर आर्थिक आघाडीवरही आव्हाने निर्माण झाली आहेत. इंधनाच्या वाढत्या किमती आणि भारतीय रुपयाच्या मूल्यामध्ये झालेली घसरण याचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाला आहे.
कंपनीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तब्बल १,८७९.१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. अशातच कोलकाता विमानतळावरील विमानाच्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे कंपनीच्या विमान सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.