सरकारसोबत डील केल्याच्या आरोपांवर व्हिडिओद्वारे दिले उत्तर; ११ किलो वजन घटल्याची पत्नी गीतांजली जे. आंगमो यांची माहिती
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांनंतर उपोषण समाप्त केले. मात्र, उपोषण संपताच त्यांच्यावर सरकारसोबत कथित डील केल्याचे आरोप होऊ लागले. या आरोपांवर अखेर त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले होते. गुरुवारी मध्यरात्री केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी २६ दिवसांचे उपोषण सोडले.
उपोषण संपल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी सरकारसोबत समझोता झाल्यामुळेच त्यांनी आंदोलन मागे घेतल्याचा आरोप केला. या चर्चांनंतर शुक्रवारी रात्री उशिरा सोनम वांगचुक यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून या सर्व दाव्यांना उत्तर दिले.
AFTER 26 DAYS OF HUNGER DO I NEED TO PROVE MY SINCERITY !!!
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 24, 2026
Do please watch and help spread the word. Find the full 22 minutes video on my YouTube Channel: Sonam Wangchuk pic.twitter.com/6CO3tjZsSD
व्हिडिओमध्ये त्यांनी आरोप करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केला. "२६ दिवसांच्या उपोषणानंतरही मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागणार आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, "जर सरकारसोबत डीलच करायची असती, तर मी २६ दिवस उपाशी राहिलो असतो का?" अशा शब्दांत त्यांनी आरोप फेटाळून लावले.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची समाप्ती झाल्यानंतर समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण त्यांच्या भूमिकेचे कौतुक करत असताना, मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.
दरम्यान, या वादावर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनीही प्रतिक्रिया नोंदवली. टीका करणाऱ्यांना उद्देशून त्यांनी लोकांनी राजकीय विश्लेषणात अडकून न पडता या आंदोलनासाठी वांगचुक यांनी दिलेल्या वैयक्तिक त्यागाची दखल घ्यावी, असे आवाहन केले.
गीतांजली जे. आंगमो यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सांगितले की, सलग २६ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे ११ किलो वजन घटले आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.