गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
ब्राझील/ नवी दिल्ली (Viatina-19 Cow Record) : ब्राझीलमध्ये झालेल्या एका विशेष लिलावात भारतीय वंशाच्या नेल्लोर (ओंगोल) प्रजातीतील ‘वियाटिना-19’ या गायीने तब्बल 40 कोटी रुपयांची विक्रमी बोली मिळवली आहे. या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. उत्तम रोगप्रतिकारशक्ती, वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टी आणि दुर्मिळ जनुकीय गुणधर्मांमुळे ‘वियाटिना-19’ सध्या जगभर चर्चेत आहे. विशेष म्हणजे, या प्रजातीचे मूळ भारतातील आंध्र प्रदेशाशी जोडलेले आहे.
वजन तब्बल 1,101 किलो
सुमारे 53 महिन्यांची ‘वियाटिना-19’ सामान्य गायींपेक्षा (Viatina-19 Cow Record) आकाराने आणि वजनाने लक्षणीय मोठी आहे. तिचे वजन तब्बल 1,101 किलो असून, नेल्लोर प्रजातीतील सामान्य गायींच्या तुलनेत ते जवळपास दुप्पट आहे. शुभ्र पांढरा रंग, सैल त्वचा, खांद्यावरील मोठा वशिंड आणि मजबूत स्नायूंची रचना ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सैल त्वचा आणि मोठा वशिंड उष्णकटिबंधीय हवामानात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
‘मिस साऊथ अमेरिका’चा किताब
‘वियाटिना-19’ची ओळख केवळ विक्रमी लिलावामुळे झालेली नाही. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील फोर्ट वर्थ येथे आयोजित ‘चॅम्पियन ऑफ द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय पशुधन स्पर्धेत तिने ‘मिस साऊथ अमेरिका’ हा किताब पटकावला आहे. (Viatina-19 Cow Record) जनावरांसाठीची ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित मानली जाते. जगभरातील उच्च दर्जाच्या गायी आणि वळूंचा या स्पर्धेत सहभाग असतो. दुर्मिळ जनुकीय वंशावळ आणि वैशिष्ट्यपूर्ण शरीररचनेमुळे ‘वियाटिना-19’ने या स्पर्धेत विशेष लक्ष वेधून घेतले.
भ्रूण आणि जनुकांना मोठी मागणी
पशुवैद्यकीय तज्ज्ञ लॉरानी मार्टिन्स यांच्या मते, ‘वियाटिना-19’मध्ये उत्तम पैदाशीसाठी आवश्यक असलेले अनेक गुण एकत्रितपणे आढळतात. त्यामुळे तिच्या भ्रूणांना आणि जनुकीय सामग्रीला मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. नेल्लोर प्रजाती प्रतिकूल हवामानातही तग धरून राहण्याची क्षमता आणि विविध आजारांविरोधातील प्रतिकारशक्तीसाठी ओळखली जाते. त्यामुळे या प्रजातीतील उच्च दर्जाच्या जनावरांच्या प्रजननासाठी जगभरातील ब्रीडर्स मोठी गुंतवणूक करतात.
भारताच्या ओंगोलपासून ब्राझीलच्या नेल्लोरपर्यंतचा प्रवास
‘वियाटिना-19’ ज्या नेल्लोर प्रजातीची आहे, तिचा इतिहास थेट भारताशी जोडलेला आहे. आंध्र प्रदेशातील ओंगोल गुरांच्या जातीवरूनच ब्राझीलमध्ये या प्रजातीला ‘नेल्लोर’ हे नाव मिळाले. 1800 च्या दशकात भारतीय वंशाची ही गुरे प्रथम ब्राझीलमध्ये नेण्यात आली. आज ब्राझीलच्या (Viatina-19 Cow Record) पशुधन क्षेत्रात भारतीय वंशाच्या झेबू प्रजातींचे मोठे वर्चस्व आहे. त्यामध्ये नेल्लोर प्रजातीचा विशेष वाटा आहे. ब्राझील हा जगातील प्रमुख नेल्लोर पैदास करणाऱ्या देशांपैकी एक बनला आहे.
भारतातील स्थानिक ओंगोल प्रजातीपासून सुरू झालेला हा प्रवास आज ब्राझीलमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विक्रमी मूल्यापर्यंत पोहोचला आहे. आधुनिक पैदास तंत्रज्ञान, जनुकीय निवड आणि योग्य संगोपनामुळे (Viatina-19 Cow Record) भारतीय वंशाच्या पशुधनाची क्षमता पुन्हा एकदा जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. ‘वियाटिना-19’चा विक्रम ब्राझीलच्या पशुपालन क्षेत्रासोबतच भारतीय वंशाच्या पशुधनाच्या वाढत्या जागतिक मागणीचेही उदाहरण ठरला आहे.