दुबई (Shafali Verma) : महिला आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय सलामीवीर शफाली वर्माने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले. पाकिस्तानने दिलेल्या 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफालीने (Shafali Verma) डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची कामगिरी दोनदा करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली. यापूर्वीही तिने पाकिस्तानविरुद्धच अशी कामगिरी केली होती.
याच सामन्यात शफालीने (Shafali Verma) आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला. अवघ्या 22 वर्षे 220 दिवसांच्या वयात तिने महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे हा पराक्रम करणारी ती सर्वांत युवा फलंदाज ठरली.
याशिवाय, शफालीने (Shafali Verma) 113 डावांत 3 हजार धावा पूर्ण करत हा टप्पा सर्वांत जलद गाठणारी फलंदाज होण्याचा मानही मिळवला. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या गॅबी लुईस आणि ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली यांच्या नावावर होता. दरम्यान, पाकिस्तानचा डाव भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 55 धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताने 8.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठत सात गडी राखून विजय मिळवला.