१९ भाविक गेले होते महाराष्ट्र दर्शनाला
खमारी/बुटी (Devotee Death) : जिल्ह्यात मोठ्या भक्तीभावाने जल्लोषात विघ्नहर्ता बाप्पा विराजमान झाले. गणेशोत्सवात महाराष्ट्र दर्शनासाठी गेलेल्या भंडारा तालुक्यातील खमारी बुटी येथील एका भाविकाचा नाशिक जिल्ह्यातील हरिहर पॉईंट येथून उतरताना पडला व त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्दैवी व धक्कादायक घटना दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता दरम्यान घडली. (Devotee Death) आशिष टिकाराम समरीत (२८) रा. खमारी बुटी असे मृतकाचे नाव आहे.
भंडारा तालुक्यातील खमारी बुटी येथील मृतक व अन्य १९ भाविक खाजगी ट्रॅव्हल्सने महाराष्ट्र दर्शनाकरीता दि.२८ ऑगस्ट रोजी निघाले होते. दि.३० ऑगस्ट रोजी ते नाशिक जिल्ह्यातील हरिहर पॉईंट येथे पोहचले. देवदर्शन आटोपून सर्व भाविक खाली उतरत असताना अचानक आशिष समरीत पडला. व त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती खमारी बुटी येथे होताच गावात स्मशान शांतता पसरली. (Devotee Death) घटनेची माहिती त्र्यंबकेश्वर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आले. आज रात्रीपर्यंत आशिष याचे मृतदेह गावात पोहचण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मृतक आशिष समरीत हा अविवाहित होता. त्याच्या स्वभावामुळे गावात परिचित होता. त्याच्या अपघाती मृत्यूची माहिती मिळताच सर्वच सुन्न झाले. ग्रामस्थ नागरिकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. घराच्या परिसरात ग्रामस्थ नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. प्रत्येक जण त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळत होता. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकाकूल आहे. गणेशोत्सवातील सार्वजनिक काम आजरोजी रद्द करण्यात आल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने सांगितली.