कारंजा(Washim):- नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनात २८ जून रोजी शहरात कॅरीबॅग (Carrybag)विरोधात मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपमुख्याधिकारी निशिकांत परळीकर, आरोग्य निरीक्षक विनय वानखडे, आरोग्य निरीक्षक(Health Inspector) राम बनसोड ,राहुल सावंत, वार्ड चपराशी व इतर नगर परिषद कर्मचारी यांच्या मार्फत सदर धडक मोहीम राबविण्यात आली.
मेडिकलवर कारवाई करून पाच हजार रुपये दंड वसूल
त्या अंतर्गत स्थानिक जीवन ज्योती मेडिकलवर कारवाई करून पाच हजार रुपये दंड व राजा जनरल स्टोअर यांच्याकडून पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, प्लास्टिक बंदीबाबत(Plastic ban) प्रशासन कडक धोरण अवलंबित असल्याने व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्याचा वापर बंद करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कारंजा शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्याकरिता सर्व व्यापारी व नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करता कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी यांनी केले आहे.