धानोरा (Gadchiroli) :- तालुक्यातील मोडेभट्टी (तुलावी टोला) येथे अवैधरित्या सुरू असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांनी २२ जून रोजी धाड टाकून नऊ आरोपींना अटक केली आहे. सहा कोंबडे व सात दुचाकी, एक चार चाकी वाहन असा ८ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
८ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
धानोरा पोलीस ठाण्याचे जवान मोहली परिसरात गस्त घालीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की मोडेभट्टी येथील जंगल परिसरातील पहाडी जवळ कोंबड्याच्या झुंजीवर पैशाच्या जुगाराचा (Gambling) खेळ खेळला जात आहे. ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगाराचा खेळ सुरू असल्याचे निदर्शनास आले . पोलिसांनी त्वरित सुरु असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर धाड टाकून आरोपी मनोज भैसारे रा. थोटेबोडी, विजय देशमुख रा. रांगी, महेश वाते रा. खारडी, जमीर शेख रा. गोकुळ नगर गडचिरोली, संदीप मेश्राम रा. रांगी, सारंग सेलोटे रा. मरेगाव ,निरंजन राऊत रा. थोटेबोडी ,सचिन सिडाम रा. खुरसा, शिवा सिंह रा. गडचिरोली अशा एकूण नऊ जणासह एक चार चाकी वाहन, सात दुचाकी वाहन व सहा नग कोंबडे असा एकुण ८ लाख ६७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (ब ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या धाडसत्रामुळे अवैधरित्या कोंबडा बाजार भरवणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
ही कारवाई (action) धानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुमित चवले ,पोलीस हवालदार भजन गावडे ,पोलीस हवालदार जनेरसिंग उसेंडी, पोलीस शिपाई मनोज दुगा, प्रवीण राऊत, चंद्रशेखर मैंद, प्रवीण गौड, विनायक मडावी, मोरेश्वर पोटावी, पुरुषोत्तम येलमुले, अमित हिडामी यांनी पार पाडली.