मानोरा (Washim) :- तालुक्यातील कार्ली ते सेवादासनगर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन रस्त्यावर गोटे उघडे पडल्याने वाहन चालविणे कठीण झाले आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन धारक यांच्यासह दोन्ही गावाच्या ये – जा करणाऱ्या नागरिकांमधून होत आहे.
तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम उपविभाग (Public Works Subdivision) मानोरा यांच्या अखत्यारीत असलेल्या कार्ली ते सेवादासनगर रस्त्याचे कामाला वर्षभरापूर्वी मंजुरात मिळाली होती. त्यावेळी कंत्राटदाराने (Contractor) रस्त्याच्या बाजूला थोडे फार रस्ता तयार करण्यासाठी साहित्य आणून टाकले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदार गायब झाले असुन शाखा अभियंता हे सुद्धा या कामाकडे फिरकून पाहत नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. आज रोजी दोन किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन रस्त्यावर दगड पडलेले असल्याने शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन ये – जा करणारे वाहन पंचर होत आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उशीरा जावे लागत आहे. त्यामुळे सदरील रस्ता त्वरीत दुरुस्त करणे गरजेचे आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व पालकांमधून होत आहे.