Gadchiroli :- रानटी हत्तींनी (Elephants)केलेल्या नुुकसानीची भरपाई तातडीने देण्यात यावी व हत्तींच्या स्थलांतरणाला होणारा अडथळा दुर करण्यात यावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, राजगाटा माल आणि जेप्रा येथील शेतकर्यांची शेती अमिर्झा मार्गावरील जंगलाला लागून असल्यामुळे, रानटी हत्ती शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. या नुकसानीमुळे शेतकर्यांचे(Farmers) जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आर्थिक नुकसानीमुळे अनेक शेतकरी आत्महत्येच्या विचाराने त्रस्त आहेत. या गंभीर समस्येकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात, चातगाव रेंजमधील काही कर्मचारी हत्तींना इतरत्र स्थलांतरित होण्यापासून अडवत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे हत्ती पुन्हा त्याच भागात परत येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून, यामुळे शेतकर्यांचे नुकसान थांबत नसल्याचे दिसुन येत आहेत.
यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांना प्रति एकर ५०,००० रुपये नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी. हत्तीचे नैसर्गिक स्थलांतर थांबवू नये, असे स्पष्ट आदेश संबंधित कर्मचार्यांना देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली. यावेळी राजगाटा माल व जेप्रा येथील पुष्पा मेश्राम, पुष्पा बावणे,सकु मेश्राम, शोभा कोडाप,शारजा नैताम,नलीनी उंदिरवाडे यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.