जिल्हा क्रीडा संकुलातील निवासी प्रशिक्षणार्थी यांना नुकतीच भेट!
हिंगोली (District Sports Complex) : जिल्ह्यात व शहरात क्रीडा वातावरण निर्मितीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे हा क्रीडा विभागाचा ध्येय आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी लिंबाळा मक्ता येथील जिल्हा क्रीडा संकुलातील निवासी प्रशिक्षणार्थी यांना नुकतीच भेट दिली. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली आणि पोलीस भरतीत मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता प्राप्त!
यानंतर जिल्हा क्रीडा संकुल समिती, हिंगोली द्वारा शहराच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल करिता 4 ते 5 एकर शासकीय जागा निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी शहरात कार्यरत असलेले, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र इमारत व लॉन टेनिस क्रीडांगणाच्या बाजूला विस्तृत प्रमाणात असलेली, जागेची पाहणी केली. ही जागा जिल्हा क्रीडा संकुलासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे. या जागेची निवड अंतिम झाल्यानंतर, त्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल करिता अनुदान मर्यादेत वाढ या अनुषंगाने 15 कोटी रुपये बांधकाम अनुदान अनुज्ञेय आहे. या रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता (Administrative Approval) प्राप्त झाल्यानंतर, अत्यावश्यक क्रीडा सुविधा जिल्हा क्रीडा संकुल समिती द्वारा निर्माण करण्यात येणार आहेत.
क्रीडाप्रेमी उपस्थित!
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, तलाठी वाबळे, संकुलाचे कर्मचारी वसीम, अर्जुन पवार व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.




