गोंदिया (Gondia):- देशात एक वेळ अशी होती की, अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून देशवासी वंचित होते. मात्र आज ही परिस्थिती बदललेली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या नेतृत्वात भारत देश विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर अग्रेसर आहे. विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले.
स्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी
डी.बी.सायन्स कॉलेज, गोंदिया येथे आज (ता.9) स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 119 व्या जयंतीनिमीत्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. गोयल यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जुबिलेंट लाइफसायंसेजचे प्रबंध निदेशक हरीशंकर भारतिया, माजी खासदार नरेश गुजराल, उद्योजक मोहित गुजराल तर विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री राजकुमार बडोले, डॉ.परिणय फुके, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, राजु कारेमोरे, जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, माजी आमदार सेवक वाघाये, नाना पंचबुध्दे व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
विकसीत भारतासाठी शिक्षण महत्वाचे
पियुष गोयल म्हणाले, विकसीत भारतासाठी शिक्षण महत्वाचे आहे. प्रफुल पटेल यांच्या वडिलांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाचे स्वरुप बघून मी सुखावून गेलो. आज गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सव्वालाख विद्यार्थी आपले उज्ज्वल भविष्य घडवित आहेत. मागील साठ वर्षात गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य घडविले आहे. सोबतच या क्षेत्रात नर्सिंगसह विविध विदेशी भाषेचे शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवक-युवतींना घडविल्यास रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले, गोंदिया जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव आहे. रोजगाराच्या अनेक संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतील, त्यासाठी शासन निश्चितच पाऊल उचलेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रोजगाराच्या अनेक संधी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतील
हरिशंकर भारतिया म्हणाले, मी गोंदिया शिक्षण संस्थेच्या प्रयोगशाळेला भेट दिली असता, सदर प्रयोगशाळा मला विश्वस्तरीय दिसून आली. प्रफुल पटेल यांचे पाय जमिनीशी जुळले असल्यानेच हे सर्व घडून आल्याची प्रचिती आज झाली असे त्यांनी सांगितले. नरेश गुजराल म्हणाले, शिक्षणामुळेच देशाची प्रगती होत आहे. मुलींना शिक्षण दिल्यास संपूर्ण कुटूंब शिक्षीत होतो. त्यामुळे विकसीत भारतासाठी शिक्षण घेणे महत्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 119 व्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गोंदिया शिक्षण संस्था व गुजराती केलवाणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदक व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
कार्यक्रमास गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने (national anthem) कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.