Dhanora :- शौचालयात गेलेल्या इसमावर रानटी डुक्कराने(Wild boar) हल्ला केल्याने वयोवृद्ध जखमी झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास तुकूम (शिवटोला) येथे घडली. सुंदर पुसू गावडे (७४ ) रा, तुकुम (शिवटोला) असे जखमी वृद्धाचे नाव आहे,
धानोरा तालुक्यातील तुकुम येथील घटना
सदर इसम सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास शौचालयात गेला असता रानटी डुकराने त्याच्यावर हल्ला केला. आरडा ओरड केल्याने रानटी डुकरांनी जंगलात पळ काढला. घराशेजारी शेती असल्याने त्यातच जंगलाचा भाग असल्याने डुकराचा कळप आला असल्याचे समजते .त्यातच एका रानटी डुकराने यांच्यावर हल्ला केल. डुकराने वृद्धाच्या डाव्या हाताला व मांडीला दोन ठिकाणी चावा घेतला. यामुळे मांस लोंबकळत राहीले. गावडे यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र गजभिये यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) सुमित पुरमशेट्टीवार (दक्षिण ) , क्षेत्र सहाय्यक आर. एम. नरुले,मिलिंद कोडाप, वनरक्षक व चमुने दवाखान्यात जाऊन विचारपूस करीत पंचनामा केला. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमीला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले,