विद्युत विभागाचे दुर्लक्ष, परिसरातील बतकम्मा सण अंधारात...
सिरोंचा (Electricity supply) : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ६५ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्ग व अविकसित परिसर म्हणून ओळख असलेल्या रेगुंठा परिसरातील १९ गावे मागील सहा दिवसापासून अंधारात असल्याने या परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रेगुंठा परिसरात १९ गावांचा समावेश आहे . मात्र या गावातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यास महावितरण कंपनी नेहमीच दुर्लक्ष करीत असते. एखाद्या वेळी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागत असतात.
यामुळे परीसरातील नागरीकांचे जनजिवन विस्कळीत होत असते. (Electricity supply) विद्युत पुरवठया अभावी मोबाईल चार्जींग करणेही जिकरीचे होऊन बसले आहे. लांब अंतरावरील गावात जाऊन मोबाईल चार्जींग करून आणावी लागत आहे. मागील सहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे .सहा दिवसापासून देवी नवरात्र आणि बदकम्मा उत्सव सुरू झाला आहे. मात्र विद्युत पुरवठाच खंडीत झाला असल्याने रात्रीच्या अंधारात कोणतेच कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा हा तेलंगाणा राज्याच्या सीमेवर असल्याने बतकम्मा सणाला अधिक महत्त्व देत असतात .या ठिकाणी बतकम्मा सुरू होऊन सात दिवस होत आहेत. या गावातील महिलांनी एकही दिवस बतकम्मा उत्सव साजरा केली नाही.
या १९ परिसरासाठी दोन विद्युत कर्मचारी आहेत. परंतु ते योग्यरीत्या काम करत नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत. सहा दिवसापासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास करण्यास विद्युत विभाग अपयशी ठरला असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. बामणी सब डिव्हिजन विभागातील महाविरण कंपनीच्या अधिकार्यांनी परीसरातील (Electricity supply) विद्युत पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी नागरीकातून केली जात आहे.