नांदगाव पेठ पोलिसांची मध्यरात्री धडाकेबाज कारवाई
तीन जण ताब्यात तर एक फरार!
नांदगाव पेठ (Fake Currency Notes) : रहाटगाव परिसरात काही इसम बनावट चलनी नोटा दैनंदिन व्यवहारात वापरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी (Nandgaon Peth Police) मध्यरात्री धडाकेबाज कारवाई करत तिघा संशयितांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल 26 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून आणखी एक आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. या (Fake Currency Notes) घटनेने अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना रहाटगाव परिसरात बनावट चलनी नोटांचा (Fake Currency Notes) वापर होत असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस पथकासह उपलब्ध पंचांना सोबत घेऊन नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या शासकीय वाहनाने घटनास्थळी रवाना झाले. रहाटगाव येथील वृंदावन कॉलनी परिसरात गुप्त बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार काही इसम अंधाराचा फायदा घेत रस्त्याकडेला बसलेले दिसून आले. (Nandgaon Peth Police) पोलिसांनी शासकीय वाहन थोड्या अंतरावर उभे करून शिताफीने सापळा रचला आणि तीन संशयितांना जागीच पकडले. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्यांना नाव विचारले असता त्यांची नावे संचित अरविंद चव्हाण (वय 19, रा. रहाटगाव प्लॉट), दीपक बाबुलाल खंडारे (वय 32, रा. पंचशिल नगर, रहाटगाव) आणि संघरत्न राजेंद्र मोटघरे (वय 36, रा. जुनी वस्ती, मस्जिदजवळ, रहाटगाव) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. पंचासमक्ष अंगझडती घेतल्यावर संचित चव्हाण कडे 500 रुपयांच्या 26 नोटा (₹13,000), दीपक खंडारे कडे 15 नोटा (₹7,500) तर संघरत्न मोटघरे कडे 12 नोटा (₹6,000) मिळून एकूण ₹26,500 रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या.
या सर्व नोटांचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर आरबीआयचा लोगो व वॉटरमार्क नसल्याचे आणि पाण्याने पुसल्यावर रंग निघत असल्याचे दिसून आले. यावरून या नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले. सर्व नोटा पंचासमक्ष सीलबंद करून जप्त करण्यात आल्या. चौकशीत संचित चव्हाण याने सांगितले की या बनावट नोटा आदित्य किशोर रामेकर (वय 25, रा. समर्थवाडी, रहाटगाव) याने बाजारात वापरण्यासाठी दिल्या होत्या.
पोलीस शिपाई निलेश जानराव साविकर यांच्या फिर्यादी या प्रकरणात चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 179 आणि 180 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Nandgaon Peth Police) पोलिसांच्या या कारवाईने बनावट नोटांचा (Fake Currency Notes) गोरखधंदा उघडकीस येताच रहाटगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये पोलीस दलाच्या तत्परतेचे कौतुक व्यक्त होत आहे.