चोरट्यांच्या मारहाणीत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी!
परभणी (Farm Theft) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील शेत आखाड्यावर झोपलेल्या वृद्ध दांपत्याला (Old Couple) चोरट्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी (Seriously Injured) करून लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना सोमवार 23 जून रोजीच्या पहाटे तालुक्यातील मरडसगाव जवळील चाटोरी रस्त्यावर गोपा शिवारात घडली आहे. चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दांपत्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीची नवीन स्टाईल शेजाऱ्याचा दरवाज्याला बाहेरून काडी!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गोपा येथील शेतकरी प्रल्हाद नरोजी बोबडे वय 65 वर्ष व त्यांची पत्नी भागीरथीबाई प्रल्हाद बोबडे वय 60 हे रविवार 22 जून रोजी रात्री मरडसगाव जवळील चाटोरी रस्त्यावर असलेल्या गोपा शिवारातील शेत आखाड्यावर झोपी गेले असता, मध्यरात्री सोमवार 23 जून रोजी 1:25 वाजेच्या सुमारास त्यांचे जावई ज्ञानेश्वर सुरवसे यांना रामदास बोबडे यांनी फोन करून सांगितले कि, शेत आखाड्यावर तुमच्या सासू व सासऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे. ही माहिती समजताच ज्ञानेश्वर सुरवसे यानी शेत आखाड्यावर धाव घेतली असता, सासू भागीरथीबाई बोबडे व सासरे प्रल्हाद बोबडे हे गंभीर जखमी (Wounded) अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसल्याने त्यांनी शेत शेजाऱ्यांच्या आखाड्यावर जाऊन त्यांच्या दाराला चोरट्यांनी बाहेरून लावलेली कडी काढून त्यांच्या मदतीने गंभीर जखमी बोबडे दांपत्याला उपचारासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात (Government Medical College Hospital) दाखल केले. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सपोनि शिवाजी शिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रल्हाद नरोजी बोबडे यांचे जावई ज्ञानेश्वर यादवराव सुरवसे रा. गोपा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड करीत आहे.
चोरट्यांनी शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून लावली कडी!
प्रल्हाद नरोजी बोबडे यांच्या आखाड्यावर चोरी करण्यापुर्वी चोरट्यांनी शेत शेजाऱ्यांच्या घराला बाहेरून लावली कडी लावत या वृद्ध दांपत्याला मारहाण करून सोन्याची बोरमाळ, मनी मंगळसूत्र व कानातले फुले असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती असुन या जबरी चोरीत किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला, हे वृद्ध दांपत्यांनी दिलेल्या जबाबानंतर स्पष्ट होईल असे बोलल्या जाते. शेत आखाड्यावरील शेजारी शेतकऱ्यांच्या घरांला चोरट्यानी बाहेरून बंद केल्याने प्रल्हाद बोबडे यांना मदत करण्यासाठी येता आले नाही. अशी खंत यावेळी बोलतांना शेजारी शेतकरी (Farmer) व्यक्त करीत होते.