सावळी सदोबा (Yawatmal) :- शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सावट अजूनही ग्रामीण भागातून हटलेले नाही. आर्णी तालुक्यातील पळशी येथील नागोराव सोनबा नैताम (वय ६०) या शेतकर्याने कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात विषारी द्रव्य (toxic substance) प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नैताम हे सकाळी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते.
नापिकीला कंटाळून स्वतःच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या
मात्र, बरीच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, ते एका झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्यांना सावळी सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत (Dead) घोषित केले.नैताम यांच्याकडे स्वतःची अडीच एकर शेती होती. काही वर्षांपासून सततच्या पिकांच्या अपयशामुळे आणि उत्पन्नात घट झाल्यामुळे त्यांच्यावर बँकेचे कर्ज वाढले होते. त्यामुळे ते मानसिक तणावात राहत होते. कर्ज वाढत चाललंय, उत्पन्न काही नाही, काय करावं कळत नाही, असे ते घरच्यांशी बोलत असत. सतत चिंतेत राहणार्या नैताम यांनी अखेर अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व चार विवाहित मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे पळशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पारवा पोलिसांकडून सुरू आहे,