कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा की कर्जफेड करावी; शेतकर्यापुढे चिंतेचा विषय
गर्रा बघेडा (Farmer Paddy Crop) : महाराष्ट्र राज्यासह पूर्व विदर्भात पावसान कहर केला. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा परिसरात चक्रीवादळाचा पाऊस कोसळला. अन् धानपिकाचे होत्याचे नव्हते झाले. धान भूईसपाट झाल्याने कापणी कशी करावी? असा प्रश्न शेतकर्यापुढे आवासून उभा ठाकला आहे. (Farmer Paddy Crop) पावसाने शेतकर्याची वाट लावली असून निसर्गाच्या पावसापुढे शेतकरी हतबल झाला असून आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? व बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे.
मागील आठवड्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या खरीप हंगामातील धानासह सोयाबीन, मिरची, कपाशी, भाजीपाला, मक्का, तूर व फळवर्गीय संत्रा, केळी व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांची घरे, जनावरे पुरात वाहून गेली तसेच खरीप हंगामातील पीक पाण्याखाली आले. शेतातील धान भूईसपाट झाले. कापणी केलेले धान ओलेचिंब झाले. कोसळलेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या शासनाकडून सर्वे होत आहे पण काही शेतकर्यांचे होत नसल्याने दुजाभाव का? असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करीत आहेत. त्यासाठी शासन प्रशासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी तुमसर तालुक्यातील काही (Farmer Paddy Crop) शेतकर्यांकडून केली जात आहे. तसेच तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावचे सरपंच घनश्याम नोनारे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकर्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे.
तुमसर तालुक्यातील शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकरी आत्मनिर्भर होण्याऐवजी आत्महत्येच्या विचारात जात आहेत. अशावेळी शासनाने तातडीने निर्णय घेऊन सरसकट मदत द्यावी, अशी मागणी सुंदरटोला चे सरपंच घनश्याम नोनारे यांनी केली आहे.