क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा इशारा : तहसीलदार मार्फत दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन!
औसा (Farmers) : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उध्वस्त केले आहे. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करा अन्यथा शेतकरी रक्तरंजित क्रांती करतील असा सज्जड इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे आणि कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे यांनी सरकारला (Govt) दिला आहे.
औसा तहसीलदाराच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. परवाच्या अतिवृष्टीमुळे कोलमडून गेलेल्या शेतकऱ्याला अद्यापही अनुदान मिळालेले नाही. निवडणुकीत संपूर्ण कर्जमुक्तीचे वचन देऊन सुद्धा ते पाळले जात नाही. शिवाय उत्पादन खर्चाच्या दीडपट शेतीमालाला भाव दिला जात नाही. अशी उदासीनता सरकार दरबारी असल्याचा थेट आरोप निवेदनात केला.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यावर सातत्याने कर्जाचा डोंगर उभा राहत असून याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. आज दररोज शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो आहे याची कसलीही दखल सरकार किंवा न्यायव्यवस्था घेत नसल्याचे चित्र आपण पाहतो आहोत. आज शेती मातीच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलनाची मालिका सुरू असून सरकार दखल घ्यायला तयार नाही. शेतकऱ्याचा असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च जर 7 हजारावर असेल आणि शेतकऱ्याला मिळणारा भाव साडेतीन हजार मिळत असेल तर यापुढे शेतकरी मरणार नाही तर कुठल्याही स्तरावर जाऊन टोकाची भूमिका घेईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.




 
			 
		

