महामहीम राष्ट्रपती, राज्यपाल यांनी लक्ष घालावे!
मानोरा (Farmers Loan Waiver) : वाशिम जिल्हयात सततचा संततदार पाऊस व ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार आर्थिक मदत देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता महामहीम राष्ट्रपती व राज्यपाल यांनी लक्ष केंद्रीत करून राज्यात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) न्याय देण्याची मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटक तथा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी पाठविले आहे.
कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा!
संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाने शेती उध्वस्त झालेली असताना सरकारला राज्यामध्ये ओला दुष्काळ दिसत नाही. तसेच सरकार (Govt) शेतकर्यांना कर्जमाफी देत नाही. सातबारा कोरा करू असे म्हणून सत्तेत आलेले महायुतीचे सरकार निवडणुकीनंतर शेतकर्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. कर्जमाफी करण्यासाठी भरपूर पैसा लागतो. सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही. असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले. एकीकडे समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन यासाठी हजारो कोटींची तरतूद करणारे व उद्योगपतींचे करोडो रुपयांचे कर्ज माफ करणारे सरकार शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याची खोटी बोंब ठोकत आहे. सरकारकडे शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे नाही. परंतु शेतकर्यांची कर्जमाफी सरकारला करायची नाही.
सरसकट शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ द्यावा!
शेतकर्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारची मानसिकता असती तर सरकारने कर्ज उचलुन कर्जमाफी केली असती, जसे विकास योजनांसाठी कर्ज घेतले आहे. तसे नियोजन करण्यात आले असते पण महायुती सरकार शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महामहीम राष्ट्रपती व राज्यपाल यांनी बळीराजाच्या समस्याकडे लक्ष केंद्रीत करून पिक कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टीची शेतकऱ्यांना सरसकट मदत, सरसकट पीकविमा मदत, घर पडझड झालेल्या शेतमजुरांना खावटीची मदत, देण्याची मागणी माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले यांनी केली आहे.