सोयाबीन विक्रीस घेऊन येणार्या शेतकर्यांची ऐन दिवाळीत अडचण!
परभणी (Farmers) : बिहारी कामगार ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी, हमाली दरात वाढ करावी, अशी मागणी करत हमाल, माथाडी कामगारांनी ऐन दिवाळीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे मोंढ्यात सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणारा शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे.
मार्केट यार्डातील कामकाज ठप्प!
परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) यार्डात काही व्यापारी बिहारी कामगारांकडून काम करवून घेत असल्याचा आरोप हमाल माथाडी कामगार संघटनांनी केला आहे. याबाबत संघटनांनी सभापती यांना निवेदन देऊन हमाली दरात वाढ करावी, बिहारी कामगार ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणार्या व्यापार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत बंदचा इशारा दिला होता. यानंतर सभापती पंढरीनाथ घुले, सरकारी कामगार अधिकारी, हमाल माथाडी कामगार संघटनेचे (Mathadi Workers Union) प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी सभापतींच्या दालनात घेण्यात आली. मात्र आधीच शेतकरी, व्यापारी अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे बंद स्थगित करावा असे सभापती घुले यांनी सांगितले. मात्र हमाल, माथाडी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. दोन दिवसापासून यार्डातील कामकाज ठप्प आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी मोंढ्यात घेऊन येत आहेत, मात्र काटा बंद असल्याने शेतकर्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. शेतकर्यांनी दिवाळी साजरी करावी का नाही ? असा प्रश्न शेतकर्यांतून उपस्थित केला जात आहे.