खताची अवैध विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण
हिंगोली (Fertilizer seller case) : शहरातील मच्छी मार्केट भागामध्ये मे. गोदावरी कृषी केंद्राने किरायाच्या गोदामात डीएपी या (Fertilizer seller case) खताच्या दुय्यम दर्जाच्या ग्रेडचा शिल्लक साठा मिळून आल्याने जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा चंद्रशेखर निलावार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की हिंगोली शहरातील मच्छी मार्केट भागामधील मे. गोदावरी कृषी केंद्रामध्ये खताची अवैध विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाला मिळाल्याने 19 जून रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी व जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षकांनी अचानक मे. गोदावरी कृषी केंद्रावर जाऊन तपासणी केली असता डीएपी खताच्या दुय्यम दर्जाच्या ग्रेडचा साठा शिल्लक आढळून आला.
पथकाने प्रत्यक्ष दुकानाची तपासणी केल्यानंतर बीपीएल या भुवनेश्वर ओरिसा खत उत्पादकाचे (Fertilizer seller case) डीएपी खताच्या 50 बॅग शिल्लक दिसून आल्या. याबाबत पथकाने केलेल्या तपासणी दरम्यान या रासायनिक खताच्या विक्रीच्या परवान्यामध्ये कोणतेही दस्तावेज मिळाले नाही तसेच खताची खरेदी बिल साठा पुस्तकात खतसाठ्याची ग्रेड निहाय पॉस मशीनमध्ये आवक व विक्री नोंद आदींबाबत असमर्थता दर्शविल्याने गोदामामध्ये शिल्लक असलेला सर्वच रासायनिक खताच्या साठ्याची विक्री बंद करून गोदामातील खताचा साठा सील करण्यात आला.
तपासणी दरम्यान जागामालक मयत उकंडीराव चव्हाण यांची मुलगी श्रीमती ज्योती उकंडीराव चव्हाण यांना पथकाने गोदामा जवळ बोलावून विचारणा केली असता सदरील गोदाम मे. गोदावरी कृषी केंद्र यांना किरायाने दिले असल्याचे त्यांनी सांगितले यावरून सदरील गोदामात साठवणूक केलेला रासायनिक खताचा साठा हा मे. गोदावरी कृषी केंद्र हिंगोली यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच कृषी केंद्र चालक कृष्णा चंद्रशेखर यांनी हे मान्य केल्याने अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलमासह इतर कलमान्वये कृषी केंद्र चालक कृष्णा चंद्रशेखर निलावार याच्या विरुद्ध जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अतुल नायसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे हे करीत आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर हिंगोलीतील कृषी केंद्राच्या गोदामात असा प्रकार आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.