Yawatmal :- मागील साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम न्यायालयाच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती आणि नगर परिषदांच्या प्रभाग रचनेचा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना प्रक्रियेला गती
७ जुलै रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात (Amravati Divisional Commissioner’s Office) जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणांवरील २९ आक्षेपांची सुनावणी पार पडली होती. या सुनावणीवरील अंतिम निर्णय १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. १८ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असून, त्याच दिवशी जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचीही प्रसिद्धी होणार आहे. त्यामुळे नगरपालिकांच्या प्रारूप आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचना सोयीच्या ठरणार की गैरसोयीच्या, याकडे इच्छुक उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.




 
			 
		
