रिधोरा (Yawatmal) :- राळेगाव तालुक्यातील वाढोण बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Centers)आग (Fire) लागल्याने महत्त्वाचे दस्तावेज जळुन खाक झाली असल्याचे दिसून येत आहे. वाढोणा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. शासनाने लाखो कोटी खर्च करून गोरगरिबांच्या आरोग्याच्या सोयी सुविधेसाठी भव्य अशी इमारत उभी केली आहे. परंतु, ही भव्य अशी इमारत शोभेची वस्तू बनली आहे.
महत्त्वाचे दस्तावेज जळुन खाक
या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अंदाजे १५ ते २० कर्मचार्यांची व दोन वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक असून या आरोग्य केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याची ओरड सुरू आहे. तर ४ ते ५ दिवसाआधी याच आरोग्य केंद्रामध्ये चिखली येथील ऋषभ झीले यांच्या पाय जळाल्याने त्यांना प्रथम उपचारासाठी या आरोग्य उपकेंद्रात आणले होते. परंतु, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार न करता त्यांच्या हातात मलमपट्टी देऊन त्यांची अकलपट्टी केल्याची तक्रार त्यांनी दैनिक देशोन्नतीला दिली होती. तर आता वैद्य अधिकार्याच्या दुर्लक्षित धोरणामुळे औषध विभागाला (Department of Medicine) आग लागून महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाली असल्याचे दिसून येत आहे.सदर ही आग २३ जून रोजी अंदाजे ९.३० च्या दरम्यान लागली आहे. या आगीमध्ये कपाटातील औषध विभाग संदर्भातील महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाली आहे.
वैद्यकीय अधिकारी यांनी येथील कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता सरळ यवतमाळ येथे निघून गेले
सदर रात्र पाळीची ड्युटी (परिचर) संतोष मेश्राम यांची होती. तर या घडलेल्या घटनेची माहिती येथील कर्मचारी यशोदा आडे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व लिपिक अरविंद केराम यांना फोनद्वारे देण्यात आली होती. सदर रात्रीचा हा प्रकार वैद्य अधिकारी यांना माहीत असूनसुद्धा याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी येथील कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता सरळ यवतमाळ येथे निघून गेले असल्याचे येथील कर्मचार्यांकडून सांगितले जात आहे. सदर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आग लागली तेव्हा वैयक्तिक अधिकारी सुद्धा उपस्थित होते. ही आग लागली कशी नेमके अजूनही कारण कळले नाही या आगीमध्ये महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाल्याने याला जबाबदार कोण ? वैद्यकीय अधिकारी की रात्री ड्युटीवर असलेले (परिचर) कर्मचारी असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. सदर या घडलेल्या प्रकाराची संपूर्ण लेखी स्वरूपाची माहिती येथील कर्मचारी कुमारी अंकिता शास्त्रकार, अरविंद केराम, आरती ढवक, यशोदा आडे, निया धुर्वे यांनी यवतमाळ येथील सबंधित अधिकार्यांना दिली असल्याचे सांगितले आहे.