ग्रामस्थांमुळे मोठी हानी टळली
परभणी/गंगाखेड (Parbhani short circuit) : अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे सोमवार 5 मे रोजी 2 वाजेच्या सुमारास वैतागवाडी येथे सरपण व पऱ्हाट्याला आग लागल्याची घटना घडली यात सरपण व पऱ्हाट्या जळून खाक झाल्या असल्या तरी ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणल्यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
गंगाखेड परळी रस्त्यावर असलेल्या वैतागवाडी येथे सोमवार 5 मे रोजी दुपारी (Parbhani short circuit) शॉर्ट सर्किट झाल्यामुळे मोकिंद शंकरराव धोंडगे यांच्या घराजवळ असलेल्या शिव बाभळीच्या लाकडानी पऱ्हाट्यांनी पेट घेतला. आग लागल्याचे समजताच पोलीस पाटील तुकाराम जंबाले यांच्यासह यशवंत निळे, सोमनाथ धोंडगे, दत्ता व्होरे, मुकुंद धोंडगे, राम वैतागे, लक्ष्मण निळे, हायलोबा वैतागे आदी ग्रामस्थांनी या आगीचा वणवा बाजूलाच असलेल्या कडब्याच्या वळईकडे वळू नये यासाठी भेटेल त्या भांड्यानी पाणी टाकत अथक परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. यात सरपण व पऱ्हाट्या जळून खाक झाल्या तरी ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे मोठे नुकसान टळले आहे.
गंगाखेड मधील दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी शिवारात सोयाबीन हरभरा जळाला
गंगाखेड : तालुक्यातील मरडसगाव येथील माणिक लक्ष्मण बाचुटे यांच्या विठ्ठलवाडी शिवारात असलेल्या शेतातील आखाड्यावर सोमवार रोजी लागलेल्या आगीत सोयाबीन, हरभरा व शेती उपयोगी साहित्य जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवार 5 मे रोजी दुपारी अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यात (Parbhani short circuit) विद्युत वाहिनीच्या तारांमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटने माणिक लक्ष्मण बाचुटे रा. मरडसगाव यांच्या विठ्ठलवाडी शिवारात असलेल्या शेत आखाड्यावरील सोयाबीन व हरभरा गंजीला आग लागली या आगीत कांदा, सोयाबीन, हरभरा व शेती उपयोगी साहित्य जळाल्यामुळे अंदाजे दिड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेची माहिती समजताच गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशामक दलातील रामविलास खंडेलवाल, श्याम जगतकर, श्रीकांत साळवे, अभिजीत साळवे, सुरज खंडेलवाल, आकाश लव्हाळे, सिताराम भेंडेकर आदींनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली.




