वन कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये एका खास मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!
पातूर (Forest Department) : वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पातूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या (Forest Range Office) वतीने वन कर्मचारी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये एका खास मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वन विभाग आणि स्थानिक लोक यांच्यातील सलोख्याचे संबंध अधिक दृढ करणे आणि वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात लोकसहभाग वाढवणे या उदात्त उद्देशाने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत वन विभागाच्या संघासहित परिसरातील सहा गावांच्या संघांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. पातूर येथील मैदानावर दिवसभर रंगलेल्या या सामन्यांना स्थानिक नागरिक आणि निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून खेळाडूंचा उत्साह वाढवला.
वन विभागाने खेळाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी जोडणी साधण्याचा हा प्रयत्न!
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात एस बी 11 पातूर या संघाने श्री सिदाजी महाराज क्रिकेट संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास गव्हाणे यांच्या हस्ते चषक आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी वनपाल श्री. प्रमोद पाटील, वनरक्षक श्री. अविनाश घुगे, श्री. अरुण राठोड आणि श्री. विष्णू सोनूने आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील संवाद अधिक सुलभ होऊन, वन्यजीव संवर्धनाबाबत जागृती वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. वन विभागाने खेळाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी (Citizens) जोडणी साधण्याचा केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.




