Parbhani suicide case :- परभणीच्या मानवत येथे शेत शेजार्यांच्या मानसीक त्रासाला कंटाळून मानवतचे माजी नगरसेवक शाम चव्हाण यांनी गुरुवार १९ जून रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास घरातील टिनशेडच्या गोदामात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. मृतकाजवळ चिठ्ठी सापडली असून त्यात शिवाजी विठ्ठलराव दहे, अमर शिवाजी दहे यांच्या मानसीक त्रासाला कंटाळून जीवनयात्रा संपवत आहे असे लिहिलेले आहे.
शेत शेजार्यांच्या त्रासाला कंटाळून घेतला गळफास
बालाजी माधवराव चव्हाण यांनी मानवत पोलिसात तक्रार दिली आहे. फिर्यादी हे गुरुवारी सकाळी परभणी येथे लग्नाला आले होते. यावेळी त्यांना फोनवर मोठे भाऊ शाम उर्फ गणपत माधवराव चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर बालाजी चव्हाण मानवतला परत गेले. रुग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी बालाजी चव्हाण व इतरांसमोर मयत शाम चव्हाण यांच्या अंगावरील कपड्यांची झडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशात चिठ्ठी मिळून आली. यामध्ये शिवाजी विठ्ठलराव दहे, अमर शिवाजी दहे यांची नावे होती. फिर्यादी यांच्या परिवाराने २० ते २५ वर्षापूर्वी मानवत शिवारात जुना देवनांद्रा रोडकडे तीन एकर शेती घेतली होती. शेतात क्रेशर खडी मशिन टाकली होती. शेत शेजारी शिवाजी दहे यांनी दोन वर्षापूर्वी शेती घेतली. त्यांच्या शेतातून (Farm) पांदन रस्ता आहे. याच रस्त्याचा वापर फिर्यादी करत होते.
शिवाजी दहे यांनी सदरचा रस्ता बंद केला. त्यामुळे वाद होत होता. तहसीलदारांनी ये – जा करण्यासाठी रस्ता मोजुन दिला. तेव्हा दहे हे आजुबाजुच्या शेतकर्यांना रस्त्याने जाऊ देत होते. परंतू फिर्यादी व त्यांच्या कुटूंबीयातील सदस्यांना रस्त्याने जाऊ न देता त्रास देत होते. विनाकारण खोटे अर्ज, तक्रारी करत होते. चार ते पाच दिवसापूर्वी देखील शिवाजी दहे, अमर दहे यांनी तहसील कार्यालय मानवत येथे तक्रार अर्ज दिला होता. तेव्हा पासून शाम चव्हाण हे मानसीक तणावात होते. शेत शेजारी शिवाजी दहे, अमर दहे यांच्या मानसीक त्रासाला कंटाळून शाम चव्हाण यांनी घरातील टिनशेडच्या गोदामात लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली.




 
			 
		

