माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला गर्भित इशारा
हिंगोली ( Minister Bachu Kadu) : शक्तिपीठ महामार्गांची मागणीच कोणी केली नाही त्यानंतरही सरकार महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे. मात्र वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू मात्र महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा माजी राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bachu Kadu) यांनी १३ सप्टेंबर शनिवार रोजी दिला आहे.
शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेच्या निमित्ताने वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bachu Kadu) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना बच्चु कडू म्हणाले की, राज्यात पेरणी पासून ते काढणी पर्यंतची सर्व कामे हमी योजनेमध्ये झाली पाहिजेत. तसेच कर्जमुक्ती, दिव्यांगांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरु आहे. या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूर हक्क परिषद घेतली जात आहे. पुढे परभणी, नांदेड, सोलापूर येथे कार्यक्रम होणार असून जळगाव येथे मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलनानंतरही शासनाने या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही तर २८ सप्टेंबर रोजी बुटी बोरी (नागपूर) येथे सर्व एकत्र येऊन नागपूरला वेढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यापुर्वी शासनाने आमच्या मागण्यांवर निर्णय घेणे अपेक्षीत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील पवनार ते पत्रा देवी या सुमारे ८०२ किलोमीटरच्या शक्तिपीठ महामार्गांची कोणीही मागणी केली नाही. शेतकर्यांचीही मागणी नसतांना हा महामार्ग मंजूर करून शेतकर्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. मात्र या महामार्गाला आमचा विरोध आहे. सरकारने या महामार्गाचे काम सुरु करू नये अन सुरु केलेच तर काम बंद करून वेळप्रसंगी गोळ्या झेलण्याची आमची तयारी असल्याचा इशारा कडू (Minister Bachu Kadu) यांनी यावेळी दिला.
राज्यातील शेतकर्यांना काहीही कमी पडणार नाही असे सरकार सांगत आहे. मात्र नुकसानीचे पंचनामेच केले जात नाही त्यामुळे मदत कशी मिळणार. सरकारचे हे डुप्लिकेट बोलणे असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने पावसामुळे नुकसानी साठी मदत जाहिर करावी, कर्जमुक्ती जाहिर करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकार एकीकडे हमी भाव जाहिर करीत आहे अन दुसरीकडे ३४०० रुपयांनी सोयाबीन विक्री करावे लागत असेल तर हमी भावाचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी (Minister Bachu Kadu) उपस्थित केला.