‘डबल पैसे’ मिळवून देण्याच्या नावाखाली केली फसवणुक!
मुळावा (Fraud Case) : गावातील एक विश्वासू नेता असलेल्या पिंपळदरीच्या सरपंच बंडू दिगांबर ढाकरे याच्याकडूनच 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार कपिल बाबुराव गायकवाड यांनी 6 ऑगस्ट रोजी पोफाळी पोलिस स्टेशन (Pofali Police Station) येथे सविस्तर तक्रार दाखल (Complaint Filed) केली असून, सरपंचासह आणखी 2 जणांनी मिळून ही फसवणूक केल्याचे आरोप आहेत.
पैसा डबल करण्याच्या आमिषाला बळी!
कपिल गायकवाड यांनी बँकेचे कर्ज आणि लोकांकडून उधारी घेऊन 15 लाखांची हार्वेस्टर घेतले होते. हप्त्यांचा तगादा वाढल्याने त्यांनी आपला हार्वेस्टर विकून पैसा डबल करण्याच्या आमिषाला बळी पडत सरपंच बंडू ढाकरे याच्यावर विश्वास ठेवून 29 मे 2025 रोजी 12 लाखाला हार्वेस्टर विकला, व त्यातील 10 लाख रुपये रोख आणले. ढाकरेने ‘पैसे डबल करून देतो’ असे सांगत, एक प्रकारचा प्रयोग करून त्यांच्या डोळ्यांसमोर नोटा डबल करून दाखवल्या. यामुळे कपिलचा विश्वास बसला आणि उर्वरित 9 लाख रुपये आणून ‘डमी नोटा’ डबल बनवून त्याच्या ताब्यात दिल्या. या संपूर्ण प्रकारात गोपाल हनुमान कुरकुटे आणि किसन गोविंदा आढाव हे सहभागी होते. 3 जून 2025 रोजी नोटा धुण्याच्या बहाण्याने घरात एक प्रकारची पूजा व धार्मिक विधी करून, नंतर डब्बा उघडल्यावर त्यात काळा द्रव आणि लिंबू आढळून आला. यानंतर सरपंच ढाकरे व इतरांनी सांगितले की, ‘मुंज्याने पैसे उचलले’ आणि गप्प बसण्याचा सल्ला दिला.
आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण!
त्यानंतर काही दिवसांनी फक्त 2 लाख रुपये परत केले. उर्वरित 8 लाख आजतागायत न मिळाल्याने अखेर कपिल गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गावचा सरपंचच (Sarpanch) फसवणुकीच्या जाळ्यात असल्याने या घटनेमुळे पिंपळदरी परिसरात खळबळ उडाली आहे. गावाचा सरपंच असल्याने ढाकरेवर अनेकांचा विश्वास होता, पण त्याच्याकडूनच आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये (Villagers) संतापाचे वातावरण आहे. पुढील तपास पोफाळीचे ठाणेदार पंकज दाभाडे करीत आहेत.