Gadchiroli :- शेतातून आरमोरी मार्गाने दुचाकीवर गडचिरोली येथील घराकडे येत असलेल्या दुचाकीस्वारांच्या दुचाकीस गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणार्या मालवाहु ट्रकने धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम ज्युबिली शाळेजवळील मुख्य मार्गावर घडली. पुरुषोत्तम बाबूराव बारसागडे( ४०),अंकुश बाबुराव बारसागडे(३५) दोन्ही रा. सुभाष वार्ड गडचिरोली अशी मृतकांची नावे आहेत.
आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम शाळेजवळील घटना
प्राप्त माहितीनुसार बारसागडे यांचे आरमोरी मार्गावर शेत आहे. नेहमीप्रमाणे बारसागडे बांधव एमएच -३३ आर-७७८९ या क्रमांकाच्या दुचाकीने शेतावर गेले होते. दरम्यान दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ते दुचाकीने गडचिरोलीकडे येत असतांना गडचिरोलीकडून आरमोरीकडे भरधाव वेगाने जाणार्या एमएच ३४ बीजी८६५७ क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दोघेही ठार झाले. दुचाकीस धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजुला जाऊन थांबला. अपघाताची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या अपघातामुळे (Accident)काही काळ आरमोरी मार्गावरील वाहतुक खोळंबली होती. पोलिसांनी ट्रकचालाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.