13 जणांवर गुन्हा दाखल 5 जण फरार!
परभणी (Gambling Den) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मसला व दुस्सलगाव येथील जुगार अड्डयावर गंगाखेड पोलिसांनी मंगळवार 5 ऑगस्ट रोजी छापा मारून दाखल केलेल्या 2 गुन्ह्यात एकुण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत 7170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुस्सलगाव येथील 8 पैकी 5 जण मात्र फरार झाले आहे.
फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्याचे (Gangakhed Police Station) पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या आदेशाने मंगळवार 5 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्री (झोला) शिवारात गस्तीवर असलेल्या जमादार संभाजी शिंदे, पो.शि. धनंजय कनके, राहुल राठोड, संग्राम शिंदे आदींना तालुक्यातील मसला येथील नवीन जिल्हा परिषद शाळेच्या बाजूस बाभळीच्या झाडाखाली काही जण पत्त्यावर पैसे लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने दुपारी 3:40 वाजेच्या सुमारास पोलीसांनी मसला येथील जुगार अड्डयावर छापा मारून शिवाजी रोहिदास शिंदे, राम शिवराम पठाडे, रंगनाथ जिजा राठोड, मंचक विश्वनाथ शिंदे व माधव शोभिवंत गहिरे सर्व रा. मसला यांना ताब्यात घेऊन जुगाराचे साहित्य व रोख 3860 रुपये जप्त केले. याप्रकरणी पो. शि. धनंजय कनके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, पो.शि. परसराम परचेवाड, धर्मराज सावंत आदींनी मंगळवार रोजीच्या सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दुस्सलगाव शिवारात छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या त्र्यंबक कारभारी सोळंके, भागवत रावसाहेब लंगोटे, बाळासाहेब विनोद वाळके या तिघांना पकडून 2 मोबाईलसह रोख रक्कम असा एकुण 3310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. परमेश्वर चंद्रभान कचरे, गणेश श्रीनिवास कचरे, माणिक बालासाहेब लंगोटे, विनोद आप्पासाहेब वाळके व कुंडलिक लहु कचरे सर्व रा. दुस्सलगाव हे पाच जण फरार झाले याप्रकरणी पो.शि. परसराम परचेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताब्यात घेतलेल्या तिघांसह एकुण 8 जणांवर गुन्हा दाखल केला. मंगळवार रोजी पोलिसांनी गंगाखेड तालुक्यातील मसला व दुस्सलगाव येथे चालणाऱ्या दोन जुगार अड्डयावर छापा मारून दोन गुन्ह्यात एकुण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करून दोन मोबाईलसह एकुण 7170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन, दुस्सलगाव येथील जुगार अड्डयावरील एकुण 8 जणांपैकी फरार झालेल्या 5 जणांचा शोध सुरु आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास गंगाखेड पोलीस करीत आहेत.