उदगीरकडच्या रामू अण्णा अन् दामू अण्णांनी मांडला पुन्हा दरबार!
रमेश लांबोटी
निलंगा (Gambling Reopening) : कर्नाटक सीमा भागालगत निलंगा तालुक्यातील तांबाळ्यात पुन्हा एकदा ‘विकासा’चा महामार्ग सुसाट सुटला आहे. होय, तांबळ्यात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग’ झालंय. उदगीरकडच्या नव्या रामू अण्णा आणि दामू अण्णांनी गाव शिवारात पुन्हा आपला दरबार मांडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या नाकावर टिच्चून थेट वरून लिंक जोडत हा दरबार सुरू झाल्याची चर्चा या परिसरात आहे. पोलीस प्रशासनाने (Police Administration) आत्ताच कारवाई केली नाही, तर काही दिवसांत मराठवाड्याचं ‘मनीलॉन्ड्रिंग सेंटर’ म्हणून या भागाची ओळख झाल्यास नवल वाटणार नाही.
गोरख धंद्याचे माहेरघर होणारा हा सीमा भागातील अड्डा पोलीस प्रशासनासाठी मोठा गड्डा!
निलंगा तालुक्यातील तांबाळा हे गाव शांतताप्रिय गाव म्हणून ओळखले जाते. पण या गावात ‘शिव’ चक्क जुगाऱ्यांला ‘शरण’ गेले आणि गावचे ‘पाटील’ही नाकाम ठरले. आज घडीला या भागात जुगार, दारू, गुटखा आणि याच्या सोबतीला बाहेरून येणाऱ्या ‘बयां’नी आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. गोरख धंद्याचे माहेरघर होणारा हा सीमा भागातील अड्डा पोलीस प्रशासनासाठी मोठा गड्डा असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी या अड्ड्यावर मोठी धाड टाकून पोलिसांनी आपली कामगिरी दाखिवली. मात्र जसजसे दिवस जातील, तस-तसे या कामगिरीतील हवा आपोआप गायब झाली. अड्डेवाला एवढा जबर निघाला की त्याने स्थानिक पोलिसांना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना अलगदरीत्या एका बाजूला काढत थेट वरूनच लिंक जोडली आणि महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागात एका शानदार शेतामध्ये वसलेल्या अड्ड्यामुळे तांबाळा गाव (Tambala Village) आता गुन्हेगारीच्या नकाशावर झळकू लागले आहे.
कार्ड रूमच्या नावाखाली जुगाराचा मोकळा धंदा सुरू!
रात्री अकरा वाजल्यानंतर गावात गाड्यांच्या लाईट्स चमकतात, म्युझिकचा गडगडाट होतो आणि कार्ड टेबलांवर सुरू असतो लाखो रुपयांचा खेळ! ‘कार्ड रूम’च्या (Card Room) नावाखाली जुगाराचा मोकळा धंदा सुरू आहे. प्रशासनाने ठरवलेल्या अटी-शर्थींचा भंग करीत बिनधास्तपणे या भागात जुगार चालविला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगाना आणि आंध्र प्रदेश अशा राज्यातून या ठिकाणी येणारे पाहुणे ‘येथेच्छ’ पाहुणचार घेऊन सूर्योदया अगोदर सीमा ओलांडतात. पोलीस मात्र या अड्ड्याची सीमा ओलांडून आत जाण्याचे धाडस करीत नाहीत.
सुधाकर बावकर साहेबांना आंतरराज्यीय अड्डा माहीत नसावा का?
एखाद्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवर्जून कामगिरी दाखविण्यास नेहमी उत्सुक असलेल्या लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (Local Crime Investigation) शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर साहेबांना या भागातील हा आंतरराज्यीय अड्डा माहीत नसावा का? आपल्या राज्यामध्ये एवढी उत्तुंग कामगिरी करणारे अड्डे असतील आणि ते माहीत होणार नसतील तर अशा गुन्हे अन्वेषण शाखांची खरंच पोलीस दलात गरज आहे का? हा खरा सवाल आहे.