२५ उमेदवारांचे ३३ उमेदवारी अर्ज पात्र
परभणी/-गंगाखेड (Gangakhed Assembly elections) : विधानसभा निवडणूकीसाठी दाखल झालेल्या २९ उमेदवारांपैकी चार जणांचे उमेदवारी अर्ज बुधवार ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननी बाद झाल्याने २५ उमेदवारांचे ३३ पात्र उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
विधानसभा निवडणूक (Gangakhed Assembly elections) प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दि. २२ ऑक्टोबर ते दि. २९ ऑक्टोबर दरम्यान तब्बल ६२ इच्छुकांनी १११ उमेदवारी अर्जाची खरेदी केली होती. उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्या ६२ इच्छुकांपैकी २९ इच्छुकांनी ३८ उमेदवारी अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जाची बुधवार ३० ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गंगाखेड, पालम व पूर्णा तहसीलदार यांनी छाननी केली असता अनामत रक्कमेची पावती न जोडल्याने बहुजन समाज पक्षाचे उमेदवार शिवराज पैठणे यांचा व वय कमी भरल्याने विशाल बंडू कदम यांचा, शपथ पत्र अपूर्ण भरल्याने राजकुमार बाबुराव राजभोज यांचा तर संग्राम केशव रेंगे यांचा अर्ज अपूर्ण भरलेला असल्यामुळे या चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले.
त्याचप्रमाणे बालासाहेब हरिभाऊ निरस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे १ व अपक्ष १ असे भरलेल्या दोन अर्जापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भरलेला उमेदवारी अर्ज ए.बी. फार्म अभावी नामंजूर करण्यात आला व अपक्ष अर्ज मंजूर करण्यात आल्याने गंगाखेड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात महायुती पुरस्कृत रासपाचे उमेदवार विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, महाविकास आघाडी शिवसेनेचे (ऊ.बा.ठा.) विशाल संजयकुमार कदम, वंचित बहुजन आघाडीचे माजी आ. सिताराम चिमाजी घनदाट मामा, जनहित लोकशाही पार्टीचे विठ्ठलराव जीवनाजी रबदडे मामा, मनसेचे रुपेश मनोहर देशमुख, न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे मदन रेनगडे, राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव सोपान शिंदे यांच्यासह अलका विठ्ठल साखरे, संजय साहेबराव कदम, स्मिता संजय कदम, जलील गुलाब पटेल, मुंजाजी नागोराव जोगदंड, नामदेव रामचंद्र गायकवाड, प्रविण गोविंदराव शिंदे, भगवान ज्ञानोबा सानप, विष्णुदास शिवाजी भोसले, लक्ष्मण शंकरराव शिंदे, विठ्ठल सोपान निरस, विशाल बबनराव कदम, विशाल बालाजीराव कदम, शिरीन बेगम मो. शफिक, शेख हबीब शेख रसूल, अँड. संजीव देवराव प्रधान व श्रीकांत दिगांबर भोसले अशा २५ उमेदावारांचे ३३ अर्ज शिल्लक राहिले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ व सोमवार ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:४५ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ असल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या ऐपतीप्रमाणे घोडेबाजार रंगण्याची शक्यता राजकीय जानकारातून वर्तविली जात आहे.
गंगाखेड मतदारसंघात राष्ट्रीय पक्षाचा एक ही उमेदवार नाही
गंगाखेड विधानसभा निवडणुकीत (Gangakhed Assembly elections) राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा पक्षाच्या महायुतीने रासपाच्या उमेदवाराला पुरस्कृत केले आहे. काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीने (ऊ.बा.ठा.) शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरविला आहे तर मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे गंगाखेड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राष्ट्रीय स्तरावरील पक्षाचा एक ही उमेदवार राहिला नाही.