परभणीत मतदानाच्या तोंडावर ऊसतोड कामगार निघाले ऊसतोडीसाठी
परभणी/गंगाखेड (Gangakhed Assembly Elections) : विधानसभा निवडणूकीच्या मतदानाची तारीख जवळ आली असतांना गंगाखेड तालुक्यातील वाडी, तांडा, वस्तीतील अल्प भूधारक शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी निघाल्याने याचा मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शासनाने राबविलेली जनजागृती मोहीम फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किमान मतदान होईपर्यंत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने उपाय योजना आखण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.
गोदावरी नदी काठावर तसेच बालाघाटच्या पर्वत रांगात वसलेल्या (Gangakhed Assembly Elections) गंगाखेड तालुक्यात मजुरांच्या हाताला काम मिळवून देणारे उद्योग व्यवसाय नसल्याने ग्रामीण भागातील बहुसंख्य तरुणांसह मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबानी यापूर्वीच पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर सारख्या महानगरात स्थलांतर केलेले आहे. तर आता साखर कारखाने सुरु होत असल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार दरवर्षीप्रमाणे ऊसतोडीसाठी स्थलांतर करीत आहे.
गंगाखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडेगावासह बहुतांश वाडी, तांडा वस्तीवरील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार म्हणून ऊसतोडीच्या कामासाठी साखर कारखान्यांकडून पैसे उच्चल घेऊन ऊसतोडीसाठी मतदार संघाबाहेर पश्चिम महाराष्ट्रासह राज्याबाहेर कर्नाटक राज्यात ऊसतोड कामगार म्हणून स्थलांतर करत असल्याने त्यांच्या मुलांना ही शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित रहावे लागत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने मोठी तयारी करत कोट्यावधी रुपये खर्च करून राज्यभर जनजागृती मोहीम राबविली.
मात्र ऐन निवडणूकीच्या (Gangakhed Assembly Elections) काळात वाडी, खेडेगावातील तांडा, वस्तीवरील ऊसतोड कामगारांचे कुटुंब घराला कुलूप लावून पाठीवर बिराड घेऊन ऊसतोडीसाठी वाहनात भरून मतदार संघाबाहेर स्थलांतर करीत असल्याचे चित्र रस्त्यावर पहावयास मिळत आहे. याचा मोठा परिणाम मात्र मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची चिन्हे निर्माण झाली तरी कामाच्या शोधात भटकंती करणाऱ्या तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूरांसह अन्य कामगारांच्या या गंभीर प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढणारा भगीरथ मात्र केंव्हा उदयास येईल का असा सवाल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होणाऱ्या अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी, शेतमजूरासह गरीब मजूर वर्गातून उपस्थित केला जात आहे.




 
			 
		

