मागील पाच दिवसांतील दुसरी घटना; संविधान चौकाचे नुकसान
परभणी/गंगाखेड (Gangakhed Tractor Accident) : शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटी झाल्याची घटना ताजी असतांना रविवार २९ डिसेंबर रोजी अकोली रेल्वे फाटकावरून मागे परत आलेली उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हा पलटी झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असुन दुचाकी व लहान वाहन धारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी शहरातील कोद्री रस्त्याने साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला डबल हेड लावून वाहतूक करतांना संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील चढ असलेल्या रस्त्यावर दोरखंड तुटल्याने घुळतीवरून मागे आलेल्या ट्रॅक्टरच्या उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या मंगळवार २४ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पलटी झाल्या होत्या यात सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नव्हती. त्याच घटनेची पुनरावृत्ती रविवार २९ डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे ३ वाजेच्या सुमारास झाली.
यात कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या (Gangakhed Tractor Accident) ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या संविधान चौकातील अकोली रेल्वे फाटकावरून परत मागे आल्या यातील एक ट्रॉली संविधान चौकाच्या कठळ्यावर कोसळली उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने संविधान चौकाच्या कठळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी जिवीत हानी मात्र झाली नसल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलीस ठाण्यासमोरच उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, व्यंकट गंगलवाड, जमादार संभाजी शिंदे, दिपक व्हावळे, गणेश चनखोरे, शंकर गयाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
आंबेडकरी कार्यकर्ते जमले
उसाने भरलेली ट्रॉली संविधान चौकाच्या कठळ्यावर पलटी झाल्याने कठळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समजताच आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संविधान चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
