परभणी/गंगाखेड (Parbhani) :- गोदावरी नदीच्या (Godawari River) काठावर वसलेल्या गंगाखेड शहराच्या उत्तरेला मासोळी प्रकल्प आहे व शहराच्या दक्षिण बाजूने गंगा वाहते असे असले तरी ही शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयात मात्र पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विविध शासकीय कामासाठी ग्रामीण भागातून या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विकतचे पाणी घेऊन आपली तहान भागवावी लागत असल्याने किमान उन्हाळ्यात तरी शासकीय कार्यालयात (Government offices) पिण्याच्या पाण्याची व सुलभ शौचालयाची (toilets) व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे.
विकतच्या पाण्यावर भागवावी लागते तहान
गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस झाल्यामुळे व गोदावरी नदीतील बंधाऱ्याला दरवाजे बसविल्यामुळे नदी पात्रात तसेच परिसरातील मासोळी प्रकल्प व अन्य छोट्या मोठ्या तलावात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याचे दिसत असल्याने ग्रामीण भागात म्हणावी तशी पाणी टंचाई जाणवत नाही ही आंनदाची बाब आसली तरी जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या गंगाखेड तालुक्यातील सर्वसामान्य तसेच अन्य नागरिक आपल्या विविध शासकीय कामांसाठी शहरातील तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, नगर पालिका आदी प्रमुख शासकीय कार्यालयात मोठ्या संख्येने येतात सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे अत्यंत कडक ऊन जाणवत आहे असे आसतांना सुद्धा शहरातील बस स्थानकासह प्रमुख शासकीय कार्यालयात मात्र नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे पहावयास मिळत असुन धरण उशाला अण कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ शहर वासियांसह तालुका वासियांवर येत असुन शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तहान लागली तर विकतचे पाणी घेऊनच आपली तहान भागवावी लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका गोर गरीब, सर्व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना बसत आहे. चालू वर्षीचा उन्हाळा पाहता किमान उन्हाळ्यात तरी प्रमुख शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी तालुका वासियांतुन केली जात आहे.