राज्यात लातूर बाजार समितीेने जपली बळीराजाप्रती बांधिलकी!
लातूर (Girls Hostel) : शेतकरी शेतमजुरांच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, या उदात्त हेतूने लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने (Agricultural Produce Market Committee) लातूरमध्ये मुलींसाठी अत्याधुनिक वसतिगृह सुरू केले आहे. शेतकरी-शेतमजुरांच्या मुलींसाठी असे वसतिगृह सुरू करणारी लातूरची उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील पहिली व एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती ठरली आहे.
जिल्हा पातळीवर सुविधा उपलब्ध करून द्यावी!
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. लातूर येथे शिक्षणासाठी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दाखल होतात. मात्र लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना लातूरमध्ये शिक्षण घेताना राहण्याची सोय होत नव्हती. विशेषतः शेतकरी (Farmer) व शेतमजुरांच्या मुलींसाठी उच्च शिक्षण घेताना राहण्याची सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे त्यांना राहण्यासाठी जिल्हा पातळीवर सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासाठी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आ. अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाजार समितीच्या नवीन गूळ मार्केट (रींग रोड बाजार आवार) अत्याधुनिक नूतन प्रशस्त इमारत बांधण्यात आली. या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मुलींचे वसतिगृह (Rashtramata Jijau Mosaheb Girls Hostel) सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांनी दिली.
100 टक्के महिला कर्मचारी सेवा देणार!
वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक मुलीसाठी टेबल, कपाट, खुर्ची तसेच शुद्ध पाणी, तसेच वसतिगृहात 100 टक्के महिला कर्मचारी सेवा देणार आहेत. वसतिगृह परिसरात सुरक्षा व स्वच्छ्ता आणि हवेशीर वातावरण असलेले मध्यवर्ती ठिकाण असल्याने लातूर तालुक्यातील शेतकरी व शेतमजूर यांच्या उच्च शिक्षण (Higher Education) घेणाऱ्या मुलींना अल्प दरात राहण्याची व्यवस्था होणार असून, याचा फायदा ग्रामीण भागातील (Rural Areas) मुलींना होणार आहे
प्रवेश प्रक्रिया सुरू संपर्क साधावा!
लातूर तालुक्यातील 11 वी, 12 वी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या शेतकरी व शेतमजूर असलेल्या पालकांनी न्यू गुळ मार्केट (रिंग रोड) राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मुलीचे वसतिगृह लातूर येथे प्रवेश घेण्यासाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूर येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले व संचालक मंडळ आणि सचिव अरविंद पाटील यांनी केले आहे.