हजारो हेक्टर शेत जमिनीवरील पिकासह गंगाखेड-धारखेड पुल पाण्याखाली!
परभणी (Godavari River Flood) : परभणीतील गंगाखेड तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाऊसामुळे जायकवाडी धरणासह माजलगाव धरणातून गोदावरी नदीपात्रात (Godavari River Basin) सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा महाप्रलय तालुक्यात सर्वत्र पसरला असुन या पुरामुळे हजारो हेक्टर शेत जमिनीवरील पिकासह गंगाखेड-धारखेड पुल (Gangakhed-Dharkhed Bridge) पाण्याखाली गेला असुन गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला, बरकत नगर, अरफात कॉलनी परिसरात ही पुराचे पाणी शिरल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना प्रशासनाने (Administration) दिल्या आहे.
शहरातील तारू मोहल्ला, बरकत नगर, अरफात कॉलनी परिसरात शिरले पाणी!
जायकवाडी धरणासह माजलगाव धरणातून गोदावरी नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आला असुन तालुक्यात सर्वत्र पुराच्या (Flood) पाण्याचा महाप्रलय पसरल्याचे चित्र दिसत आहे. छोट्या मोठ्या नदी नाल्यातुन व ओढ्याद्वारे पुराचे बॅक वॉटर गोदावरी नदी काठच्या धारासूर, मैराळसावंगी, गौडगाव, चिंचटाकळी, ब्रम्हनाथवाडी, खळी, जवळा, रुमणा, सायळा, सुनेगाव, आनंदवाडी, महातपुरी, दुस्सलगाव, मुळी, भांबरवाडी, धारखेड, गंगाखेड, झोला, पिंपरी, नागठाणा, मसला, भुजबळ सावंगी आदी गावांच्या शिवारासह गावात शिरल्याने हजारो हेक्टर शेत जमिनीवरील पिकांसह गोदावरी नदीवर असलेला गंगाखेड – धारखेड पुल, खळी गावाजवळील पुल, जवळा, सायळा, सुनेगावाजवळील इंद्रायणी नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने खळी, ब्रम्हनाथवाडी, चिंचटाकळी, गौडगाव, मैराळसावंगी, जवळा, सायळा, सुनेगाव, धारखेड, मुळी, नागठाणा, अँगलगाव, धसाडी, खरबडा, भुजबळ सावंगी आदी गावांकडे जाणारे रस्ते बंद झाले आहे तर गंगाखेड शहरातील तारू मोहल्ला, बरकत नगर व अरफात कॉलनी परिसरात ही पुराचे पाणी शिरल्याने या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी दिल्या असुन तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, नायब तहसीलदार मो. आजीम, अशोकराव केंद्रे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, नगर परिषद मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आदी अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी शंकरराव राठोड, मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे, तलाठी, ग्रामसेवक पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
गंगाखेड – धारखेड पुलावरील वाहतूक बंद!
गंगाखेड शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या गंगाखेड-धारखेड पुलावर पुराचे पाणी आल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.