पंधरा हजार रुपये दंड व सेवा पुस्तकात नोंद करण्याचे निर्देश
गोंदिया (Gondia Panchayat Samiti) : पंचायत समिती देवरी येथे पशु संवर्धन विभागात कार्यरत असताना सेवानिवृत्त सुनिल आकांत हे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून पदावर कार्यरत होते. तर दुसरीकडे ते श्री समर्थ रामदास शिक्षण संस्था आमगाव येथे मानद सचिव म्हणून सन २००९ पासून काम पाहत होते. या संदर्भात जि.प.कडे तक्रार करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अधिनियमातंर्गत तत्कालीन मुकाअ दयानिधी यांनी पदाचा दुरूपयोग करीत असल्याचा ठपका ठेवत कारवाई केली. दरम्यान कारवाईवर आकांत यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने १० ऑक्टोबर २०१४ रोजी सदर खटल्यात आकांत यांना लाभलेली शिक्षा रद्द करून त्यांना सेवानिवृत्ती वेतन परत करण्यात यावे तसेच तत्कालीन मुकाअ यांच्यावर दंड ठोठावून यासंदर्भात नोंद सेवा पुस्तकात करण्यात यावे, असे निर्देश दिले आहे.
सविस्तर असे की, जि.प.च्या पशुसंवर्धन विभागात देवरी येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून सुनिल आकांतहे कार्यरत होते. तर दुसरीकडे श्री समर्थ रामदास शिक्षण संस्थेत मानद सचिव म्हणून आकांत काम पाहत होते. या संदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली. दरम्यान आकांत यांनी जिल्हा परिषदेकडून कसलीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे जि.प.च्या अधिनियमातंर्गत पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवत त्यांना नोटीस बजावण्यात आले. तसेच त्यांना यापुढे संस्थेत काम करणे बंद करावे असे आदेश देण्यात आले होते. त्या विरोधात आकांत यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात दाद मागितली. त्यात मुख्य कार्यपालन अधिकारी यांचे आदेश रद्द केले.
परंतु, यापुढे हा आदेश यांच्याविरुद्ध कारवाईसाठी राहु शकत नाही, असेही नमुद करण्यात आले होते. या वाक्याचा चुकीचा अर्थ लावून तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.दयानिधी यांनी आकांत यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून पाच टक्के वेतन ५ वर्षापर्यंत कपात करण्याचे आदेश दिले. याविरूध्द आकांत यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणाच्या निर्णयादरम्यान याचिकेत आकांत यांना दिलेली शिक्षा रद्द करून त्यांना सेवानिवृत्ती वेतनातून वसूल केलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत.
उल्लेखनिय असे की, याबाबत तत्कालीन मुकाअ दयानिधी यांना १५ हजार रूपये दंड १८ ऑक्टोबरपर्यंत रजिस्टारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहे. तसेच याबाबतची नोंद त्यांच्या सेवापुस्तिकेत करण्यात यावी, अशाही सुचना केल्या आहेत. न्यायालयात आकांत यांची बाजू अॅड. राम परसोडकर तर जिल्हा परिषदेची बाजु अॅड. ए. वाय. कापगते यांनी मांडली. न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत एकच खळबळ उडाली.