Hinganghat :- पांढरकवडा येथून चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा येथे जाणाऱ्या तांदळाच्या ट्रकाला पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे नाकेबंदी करून ताब्यात घेतले होते. मात्र या प्रकरणात अन्नपुरवठा विभागाने दिलेला शासकीय अहवाल सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
अहवालातील विसंगती:
ताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये ४५७ कट्टे प्रत्येकी ५० किलोचे तांदूळ होते. अन्नपुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात या तांदळाला सर्वसाधारण प्रतीचा तांदूळ म्हटले असून, तो खुल्या विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतो असे मोघम उत्तर नमूद केले आहे. या अस्पष्टतेमुळे अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारवाईत विलंब आणि मर्यादा:
पोलिसांनी नाकेबंदी करून ट्रक ताब्यात घेतल्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून अन्नपुरवठा विभागाला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अहवाल सादर करण्यात तब्बल तीन दिवस लागले. शिवाय तांदूळ तपासणीसाठी शासनाकडे कोणतीही वैज्ञानिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने, चार दिवस पोलिस ठाण्यात उभा असलेला ट्रक अखेरीस सोडावा लागला.हा ट्रक पांढरकवड्याच्या हारून ट्रेडर्स यांच्याकडून चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा येथे जात होता. या कारवाईत विलंब आणि तपासणीतील त्रुटीमुळे अन्नपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




