मराठा आरक्षणावर ‘छावा’चा सरकारला इशारा
अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती साजरी
लातूर (Maratha Reservation) : मराठा समाजाच्या भविष्यातील संकटांचा अंदाज अण्णासाहेब जावळे पाटलांना होता. त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाच्या प्रश्नासह इतर बहुजनांचे प्रश्न घेऊन आयुष्यभर लढा दिला. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्यांनी सर्वप्रथम मांडला, त्या अण्णासाहेब जावळे पाटलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छावा संघटना कटिबद्ध आहे. हात जोडून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर मनगटाच्या जोरावर आरक्षण कसे मिळवायचे? हे आम्हाला ठाऊक आहे, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला.
अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत नानासाहेब जावळे पाटील बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की, आपणाला अण्णासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे. अण्णासाहेब जावळे पाटील जंगले समाजासाठी, गेले समाजासाठी. मराठा समाजासाठी त्यांनी स्वतःचा प्राण दिला. त्यांनी संघटनेचा वापर स्वार्थासाठी नाही तर समाजासाठी केला. आपल्यापुढे अण्णा साहेबांचा आदर्श असून आपणही त्यांनी सांगितलेल्या विचारावरच संघटना पुढे नेऊ, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. (Maratha Reservation) छावाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी. जे काम करतील, त्यांनाच पदावर राहण्याचा अधिकार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शेवटी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील यांनी आभार मानले.




 
			 
		

