पाथरी शहरातील गणेश नगरातील घटना अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल …!
परभणी/पाथरी (Pathari Crime) : शहरातील गणेश नगर येथील श्रीकृष्ण हार्डवेअर हे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडत दुकानाच्या गल्ल्यातील ७० हजाराची रोकड लंपास केली. या प्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळ माणिकराव होगे यांनी पाथरी पोलिसात तक्रार दिली आहे. शुक्रवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे आपले श्रीकृष्ण हार्डवेअर हे दुकान बंद केले. या दुकानातील काऊंटरच्या गल्ल्यात ७० हजार रुपये रोकड ठेवलेली होती. दुसर्या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास फिर्यादीच्या मित्राने फोन करुन दुकानाचे शटर उघडे असल्याचे कळविले.
गोपाळ होगे यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. दुकानातील साहित्याची पाहणी केली असता त्यांना फर्निचरची तोडफोड झाल्याचे दिसून आले. तसेच काऊंटर मधील ७० हजार रुपये चोरीला गेले असल्याचे दिसले. या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.