७१ आक्षेप अर्जा पैकी ६० अर्जदारांची उपस्थिती ; ११ अर्जदार राहिले गैरहजर…!
परभणी (Parbhani Municipality) : शहर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्याा अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली होती. या प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकती, सुचनांची सुनावणी गुरुवार १८ सप्टेंबर रोजी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत पार पडली.
सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या नियंत्रणात सर्व प्रक्रिया झाली. (Parbhani Municipality) सुनावणी करीता आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, नगरसचिव तथा निवडणुक विभाग प्रमुख विकास रत्नपारखे, नगर रचनाकार वसीम पठाण, सहाय्यक नगर रचनाकार पवन देशमुख, अदनान कादरी यांची उपस्थिती होती. गुरुवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सायंकाळी ६.४५ पर्यंत सुनावण्या चलल्या.
महापालिका निवडणुकीसाठी (Parbhani Municipality) प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आल्यानंतर त्यावर आक्षेप, हरकती घेण्यासाठी सोमवार १५ सप्टेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. विहित मुदतीत ७१ आक्षेप दाखल झाले. सुनावणीच्या दिवशी ६० अर्जदारांनी उपस्थिती नोंदविली. तर ११ अर्जदार अनुपस्थित होते. उपस्थित असलेल्या सर्व अर्जदारांची सुनावणी प्रक्रिया पार पडली आहे.
सुनावणी नंतर हरकती व सुचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकारी यांनी अंतीम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी संबंधीत महानगरपालिका आयुक्तांमार्फत १९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत नगरविकास विभागाकडे अंतीम केलेली प्रभाग रचना सादर करतील. तेथून पुढे पुढीची प्रक्रिया होईल.