शेतकऱ्यांचे स्वप्न मातीमोल: गंजी गेल्या वाहून, दुबार पेरणीचे संकट!
लातूर (Heavy Rain) : आंध्र प्रदेशावर धडकलेल्या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम लातूर शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी रात्री जोरदार पावसाच्या रूपाने जाणवला. जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक शेतकऱ्यांचा रबी पेरा यामुळे वाया गेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील रेणा नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांच्या (Farmers) सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजी वाहून गेल्या!
मंगळवारी सायंकाळी लातूर जिल्ह्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली, नंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला. हा पाऊस रात्रभर पडत राहिला. या पावसामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांना पाणी आले. अचानक झालेल्या या पावसामुळे व पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजी वाहून गेल्या. शेती साहित्यही पुरामध्ये वाहून गेले. नदीकाठी काढून ठेवलेल्या सोयाबीनचे तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली. रेणापूर व देवणी तालुक्यात अतिवृष्टी नोंदले गेली. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंदणी तालुक्यातील बोरोळ मंडळात झाली असून ती १६३ मिमी आहे. रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव मंडळात १५७.८ मिमी., रेणापूर मंडळात १५७.३ मिमी, पानगाव मंडळात १२८, पळशी ११८.८ देवणी १०८ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी ६२.६ मि.मी. पाऊस म्हणजे अतिवृष्टी नोंदली गेली.
लातूर तालुक्यात (५६.५), औसा (२७.४), अहमदपूर (६४.५), निलंगा (६४.४), उदगीर (५२.६), चाकूर (६०.३), रेणापूर (१२६.८), देवणी (१०७.५), शिरूर अनंतपाळ (६४.५) आणि जळकोट (३१.१) मिमी पाऊस नोंदला गेला आहे.
या मंडळांमध्ये नोंदली अतिवृष्टी…
लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, त्यामध्ये लातूर, बाभळगाव, कासारखेडा, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधोरी, निलंगा, निटूर, औराद शहाजानी, कासार बालकुंदा, अंबुलगा, मदनसुरी, हलगरा, भुतमुगळी, उदगीर, मोघा, तोंडार, नळेगाव, झरी, आष्टा रेणापूर, पोहरेगाव, पानगाव, कारेपूर, पळशी, देवणी, बोरोळ, साकोळ, हिसामाबाद या मंडळांचा समावेश आहे.
दुबार पेरणीचा भूर्दंड सहन करावा लागणार!
यंदा दिवाळी सरली तरीही पाऊस पडत आहे. त्यातच मंगळवारी रात्री जोरदार पावसाने झोडपले. जिल्ह्यात जवळपास 31 मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदली गेली. जिल्ह्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी रबी पेरा सुरू केला होता. मात्र या अतिवृष्टीमुळे झालेला पेरा मातीमोल ठरला आहे. या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पेरणीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
