तातडीने दुरुस्तीची मागणी!
परभणी (Heavy Rain) : परभणीच्या पाथरी तालुक्यात 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) तालुक्यातील वडीहून निवळी गावाकडे जाणारा मुख्य रस्त्यावरील पुलाचे मोठे नुकसान (Bridge Damage) झाले आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला असून, निवळी गावाचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. परिणामी, एसटी बससेवा आणि खाजगी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे, ज्यामुळे गावातील शालेय विद्यार्थ्यांना (Students) शाळेत जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी!
या पुलावरून दररोज अनेक विद्यार्थी परिसरातील शाळांमध्ये शिक्षणासाठी जातात. मात्र, पुलाचे नुकसान झाल्याने गेल्या आठवड्याभरापासून त्यांचा शाळेचा प्रवास थांबला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, काही विद्यार्थ्यांचे परीक्षापूर्व सराव वर्गही अर्धवट राहिले आहेत. सदर गंभीर समस्येची दखल घेत, 24 जुलै रोजी स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि पाथरी पंचायत समिती (Pathri Panchayat Committee) बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना पत्राद्वारे कळवले होते. मात्र, आजतागायत कोणतीही दुरुस्ती करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जोपर्यंत पुलाची तातडीने दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत या मार्गावरून कोणतेही सार्वजनिक किंवा खाजगी वाहन चालवणे धोकादायक आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या (Villagers) वतीने करण्यात आली आहे.