जिल्ह्यातील ३० पैकी १९ मंडळामध्ये अतिवृष्टी!
हिंगोली (Heavy Rain) : जिल्ह्यात पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. शनिवारी सकाळपासून एकसारखा मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे शिक्षण विभागाने सर्व शाळा सुट्टी दिली होती. झालेल्या अतिवृष्टीमुळे यवतमाळ, नांदेड,हिंगोली मार्गावरील पैनगंगा नदीच्या (Panganga River) पुलावरून पाणी वाहिल्याने संपर्क तुटला होता. या पावसाचा वसमत तालुक्यात मोठा फटका बसला आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६.२ मिलीमीटर पावसाची नोंद!
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त ९९.१ मि.मी. पाऊस झाला आहे. तर सेनगाव तालुक्यात सर्वात कमी २६.५ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात शनिवार रोजी सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली ६६.३ (९५८.९), कळमनुरी ६४.७ (११६१.५), वसमत ९९.१ (१२०३.९), औंढा नागनाथ ७०.५ (११५२.७) आणि सेनगाव तालुक्यात २६.५ (८६६.१) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक १ जून २०२५ ते २७ सप्टेंबर, २०२५ पर्यंत सरासरी १०६२.८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी १३६.३ अशी आहे. हिंगोली तालुक्यातील पाच, कळमनुरी तालुक्यातील तीन, वसमत तालुक्यातील सात व औंढा नागनाथ तालुक्यातील चार अशा एकूण १९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील हिंगोली, सिरसम, बासंबा व माळहिवरा मंडळात प्रत्येकी ८० मिमी तर दिग्रस मंडळात ७१.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी १०३.८, वाकोडी १०७ व डोंगरकडा मंडळात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसमत तालुक्यातील वसमत व हयातनगर मंडळात १२८.८, आंबा ११२.३, गिरगाव ६७.५, हट्टा ७३, टेंभुर्णी ७८.३ व कुरुंदा मंडळात १०४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा मंडळात ७७.८, येहळेगाव ७१.३, साळणा ६६.३ व जवळा बाजार मंडळात ६६.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुराच्या पाण्यातून जाण्याचे धाडस दाखवू नये असे आवाहन!
या पावसामुळे कयाधू नदीलाही मोठा पुर आला होता. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुरुंदा या गावातून ओढ्याला पाणी आले होते. कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावालगत असलेल्या तलावाच्या सांडव्याचा काहीभाग तुटल्याने हे पाणी जवळपासच्या शेतीमध्ये घुसले होते. येलदरी धरणातून (Yeldari Dam) विसर्ग सुरु झाल्याने सिध्देश्वर धरणाचे ६ गेट ०.३ मिटरने वाढवण्यात आले. त्यामुळे या धरणाचे ६ दरवाजे ०.६१ मिटरने व ८ दरवाजे ०.३ मिटरने सुरु होवून १६२६४ क्युसेस इतका विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला. इसापूर उर्ध्व पैनंगगा प्रकल्पाच्या १५ दरवाजापैकी १३ दरवाजे ०.५० मिटरने उघडले. त्यातून २२०६२ क्युसेस विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरु आहेत. येलदरी प्रकल्प सांडव्याच्या मुख्यद्वारामधून ४२२० व विद्युत निर्मीती केंद्रातून २७०० असा ६९२० क्युसेस विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरु आहे. सर्वत्र अतिवृष्टीमुळे नागरीकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे तसेच पुराच्या पाण्यातून जाण्याचे धाडस दाखवू नये असे आवाहन देखील केले आहे.
जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर!
हवामान विभागाने (Department of Meteorology) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट (Alert) तर हिंगोली व इतर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आल्यामुळे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी जिल्ह्यातील शाळांना सुटी घोषित केली आहे.जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या निर्देशानुसार ही सुटी घोषित करण्यात आली. तसे आदेश सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना दिले होते.