अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान!
पातुर (Heavy Rain) : पातुर तालुक्यात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक गावांमध्ये शेतीचे प्रचंड नुकसान (Agricultura Losses) झाले असून, प्रशासनाने आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. तहसीलदार यांच्या आदेशानुसार, यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पातुर तालुक्यात दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
ही पथके वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करणार!
या गंभीर परिस्थितीची दखल घेत तहसीलदार (Tehsildar) यांनी तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी चार स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकात मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवक यांचा समावेश आहे. ही पथके वेगवेगळ्या मंडळांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.
पथकांची रचना आणि कार्यक्षेत्र:
* पथक क्र. १: मंडल अधिकारी, आलेगाव यांच्या नेतृत्वाखालील हे पथक आलेगाव, गोळेगाव, पिंपळडोळी, चिंचखेड चि., वरणगांव, डोलाखेड, चरणगांव, चोंढी, पांढुर्णा, जांब, दधाम, अंबासांगवी, चारमोळी, पाचरण, गायवडगांव, पाडसिंगी या गावांमध्ये पंचनामे करणार आहे.
* पथक क्र. २: मंडल अधिकारी, बाभुळगांव यांच्या नेतृत्वाखालील पथक हिंगणा(वाडे), अंबाशी, दिग्रस खु. या गावांमध्ये पाहणी करेल.
* पथक क्र. ३: मंडल अधिकारी, सस्ती यांच्या नेतृत्वाखालील पथक दिव्स बु., निमखेड, तुळंगा बु., सस्ती-२, तुळंगा खुर्द, सांगाळा, लांवखेड, चोंडी, टा.चोंडी, विवरा, सुकाळी या गावांचे सर्वेक्षण करेल.
* पथक क्र. ४: मंडल अधिकारी, पातुर यांच्या नेतृत्वाखालील पथक आगिखेड, पार्डी, कोठारी बु., कोठारी खु., बामखेड, आस्टूल, पास्टूल, माळराजुरा, कोसगांव या गावांमध्ये पंचनामे करेल.
तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार, या सर्व पथकांनी तीन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालाच्या आधारे शासनाकडे मदतनिधीची मागणी केली जाईल. या त्वरित कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांना लवकर मदत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.