वणी (Yawatmal) :- वणीतील व्यावसायिक राजा सुरेश जयस्वाल (४१) त्यांची पत्नी श्रद्धा राजा जयस्वाल (३६) व त्यांची २ वर्षीय मुलगी काशी जयस्वाल यांचा उत्तराखंड येथे १५ जून रोजी पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ते देवदर्शनासाठी उत्तराखंड केदारनाथ येथे गेले होते.
पत्नीसह दोन वर्षीय मुलीचा समावेश
प्राप्त माहितनुसार जयस्वाल कुटुंबीय केदारनाथ येथे दर्शनाकरिता गेले होते. दरम्यान रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड जवळ केदारनाथ (Kedarnath) वरून गुप्त काशीकडे जात असताना हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter accident) झाला. आर्यन एव्हिएशनचे हे हेलिकॉप्टर होते. क्रॅश हेलिकॉप्टरमध्ये एकूण ७ प्रवासी होते. यात वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याचे समोर येत आहे. गौरीकुंड – सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती. यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राजा जयस्वाल व त्यांचे कुटुंबीय या अपघातात मृत झाल्याचे कळताच वणी सह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. वणीमध्ये कोळसा व्यावसायिक, ट्रान्सपोर्टर व शिवभक्त म्हणून राजकुमार जयस्वाल यांची ओळख होती. वणीत प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कार्यक्रम घडवून आणण्याचे श्रेय राजकुमार जयस्वाल व त्यांची पत्नी श्रद्धा यांना मिळाले होते.
अत्यंत कमी वयात एक उत्कृष्ठ व्यावसायिक म्हणून त्यांनी वणीत ओळख बनविली होती. त्यांच्या मागे दोन मुले, आई, बहिणी, जावई असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. अत्यंत धार्मिक व्यक्ती म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या व कुटुंबियांच्या अचानक मृत्यूने (Death) संपूर्ण वणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.