वसमतमध्ये एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल
हिंगोली (Hingoli Assembly Election) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये आज हिंगोली जिल्ह्यात ५६ इच्छुकांनी १२३ अर्जांची उचल केली आहे. तर ९२-वसमत विधानसभा मतदारसंघात (Hingoli Assembly Election) जगन्नाथ लिंबाजी अडकिने यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. २२ ऑक्टोंबर मंगळवार पासून राज्यात निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, नामनिर्देशन पत्र विक्री व दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी १५३ अर्जांची विक्री झाली. तर आज दुसर्या दिवशी ५६ इच्छुकांकडून १२३ अशा दोन दिवसात जिल्ह्यात २७६ अर्जांची विक्री झाली आहे. मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे.
यावेळी ९२-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, ९३-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपविभागीय आधिकारी प्रतिक्षा भुते, ९४-हिंगोली विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
एका उमेदवारास जास्तीत जास्त ४ अर्ज घेता येतात. नामनिर्देशनपत्रे २९ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. ३० ऑक्टोंबर बुधवार रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. तर ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २२ ऑक्टोंबरपासून नामनिर्देशनपत्र घेणे व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसर्या दिवशी वसमत (Hingoli Assembly Election) विधानसभा मतदार संघात एकमेव एका इच्छुकानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उद्याचा अनेकांकडून मुहूर्त
उमेदवारी दाखल करण्याचे दोन दिवस उलटले. आज २४ ऑक्टोंबर रोजी अनेक इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. त्यामुळे तहसील कार्यालयावर आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.