हिंगोली (Hingoli) :- नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झालेला, हिंगोलीचा संशोधक, पुष्यमित्र जोशीची ब्रिक्स (BRICS) संघटनेमध्ये भारत सरकारकडून युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. भारत सरकारच्या ब्रिक्सच्या पुढील बैठकांमध्ये पुष्यमित्र (Pushyamitra) भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करणार आहे.
ब्रिक्स संघटनेत भारत सरकारच्या प्रतिनिधीपदी सलग दुसऱ्यांदा निवड
याआधी मागील वर्षी देखील ब्रिक्सच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये पुष्यमित्रने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ब्रिक्स ही भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून तयार झालेली शिखर संघटना आहे. आता त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया व युनायटेड अरब अमीरात या देशांचाही समावेश झाला आहे. जगाच्या लोकसंख्येचा ४५% भाग व अर्थव्यवस्थेचा २८% भाग ब्रिक्स देश व्यापतात. एवढा मोठा विस्तार असणाऱ्या संघटनेत पुष्यमित्र जोशी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकताच भारताच्या संसदेत देशाचा सर्वोच्च युवा पुरस्कार असलेला राष्ट्रीय युवा पुरस्काराने पुष्यमित्रला गौरविण्यात आले. पुष्यमित्र जोशी हा एक संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून सुपरिचित आहेत. त्याच्या कार्यामुळे समाजपरिवर्तनासाठी उपयुक्त असलेले संशोधन घडवले आहे. त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे.
डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित लावली विल्हेवाट
कोविड-१९ च्या काळात, त्याने डिस्पोजमित्र (DisposalMitra) उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले होते. त्याचबरोबर, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युनो बूस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वितरित केले. भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. या समस्येवर उपाय म्हणून, पुष्यमित्र जोशीने ‘अॅक्वामित्र’ हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले आहे. हे संशोधन अतिशय कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईड कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. पुष्यमित्र जोशीनी विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यावर तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत, जी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर लेख देखील प्रसिद्ध आहेत. जी२० जागृती यात्रेत ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय युवा महोत्सवात केले आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्याला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.